वृत्तसंस्था/पॅरिस
2025 च्या टेनिस हंगामातील फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेला येथे 25 मे पासून प्रारंभ होत आहे. दरम्यान आतापर्यंत 14 वेळा फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम जेतेपद मिळविणाऱ्या स्पेनच्या राफेल नादालचा स्पर्धा आयोजकांकडून स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सत्कार केला जाणार आहे. सदर माहिती फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या संचालिका अॅमेली मॉरेस्मो यांनी दिली आहे. स्पेनच्या नादालने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 22 ग्रॅन्डस्लॅम अजिंक्यपदे मिळविले असून तो गेल्या नोव्हेंबरमध्ये टेनिस क्षेत्रातून निवृत्त झाला होता. नादालने फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक म्हणजे 14 अजिंक्यपदे मिळविण्याचा विक्रम केला आहे. फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम म्युझीयममध्ये नादालचा पुतळा उभारण्यात येणार आहे.









