वृत्तसंस्था/ पॅरीस
सोमवारी घोषित करण्यात आलेल्या एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत स्पेनचा अनुभवी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा टेनिसपटू राफेल नदालला 2005 नंतर प्रथमच पहिल्या 10 खेळाडूमध्ये स्थान मिळवता आले नाही. या ताज्या मानांकनात नदाल आता 13 व्या स्थानावर आहे. या मानांकन यादीत स्पेनचा कार्लोस अॅलकॅरेझ पहिल्या स्थानावर आहे.
22 वेळा ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवणाऱ्या राफेल नदालने 912 आठवडे एटीपी मानांकनात पहिल्या दहा खेळाडूत आपले स्थान 2005 पासून सातत्याने राखले होते. कॅलिफोर्नियात झालेल्या इंडियन वेल्स बीएनपी पेरीबस आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत नदाल सहभागी होता आले नाही. गेल्या वर्षी इंडियन वेल्स मास्टर्स 1000 दर्जाच्या स्पर्धेत नदालने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र अलीकडच्या कालावधीत त्याला वारंवार स्नायु दुखापतीने चांगलेच दमवले आहे. गेल्या जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत दुसऱ्या फेरीतच नदाल पराभूत झाला होता. आता आगामी होणाऱ्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत तो पुन्हा पूर्ण तंदुरुस्तीनिशी पुनरागमन करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या माँटेकार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेसाठी नदालने आपल्या सरावाला प्रारंभ केला आहे. नदालने आतापर्यंत 14 वेळा प्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली आहे.









