वृत्तसंस्था/ मेलबोर्न
येथे सुरू असलेल्या पहिल्या मिश्र सांघिक युनायटेड चषक आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत राफेल नदालला इंग्लंडच्या कॅमेरून नुरीकडून अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर साहजिकच नदाल नाराज झाला. तूर्ताला आपण निवृत्तीचा विचार करत नसल्याचे स्पष्टीकरण नदालने वृत्तसंस्थेशी बोलताना केले.
नदालने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत आतापर्यंत विक्रमी 22 ग्रॅण्डस्लॅम अजिंक्मयपदे मिळविली आहेत. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पहिल्या युनायटेड चषक मिश्र सांघिक टेनिस स्पर्धेतील लढतीत इंग्लंडच्या कॅमेरून नुरीने नदालचा 3-6, 6-3, 6-4 अशा सेट्समध्ये पराभव केला. नुरीचा 36 वषीय नदालवरील हा पहिला विजय आहे. यापूर्वी उभयतामध्ये पाच सामने झाले होते. येथे जानेवारीच्या दुसऱया आठवडय़ात सुरू होणाऱया 2023 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत नदाल पुन्हा नव्या जोमाने जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे. 2022 चा टेनिस हंगाम नदालला संमिश्र गेला. या कालावधीत त्याने सलग 20 एकेरी सामने जिंकले आहेत. नदाल आता आगामी ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेसाठी आपल्या सरावावर अधिक भर देत आहे.









