जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्हही शेवटच्या चार खेळाडूत दाखल
पॅरिस / वृत्तसंस्था
स्पेनच्या राफेल नदालने आपला कट्टर प्रतिस्पर्धी नोव्हॅक जोकोविचला पराभवाचा धक्का देत प्रेंच टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत धडक मारली. चार सेट्सपर्यंत रंगलेल्या या सामन्यात नदालने 6-2, 4-6, 6-2, 7-6 (4) अशा फरकाने विजय संपादन केला. अन्य लढतीत जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हने स्पेनच्या कार्लोस अल्कारेझला 6-4, 6-4, 4-6, 7-6 (7) अशा फरकाने नमवत शेवटच्या चारमध्ये धडक मारली.
सर्वोत्तम फटक्यांची निवड आणि त्याचा ट्रेडमार्क बचाव, हे नदालच्या खेळीचे येथेही मुख्य वैशिष्टय़ ठरले. येथे जोकोविचला नमवल्यानंतर नदाल क्ले-कोर्ट ग्रँडस्लॅम स्पर्धेतील आपल्या 14 व्या ग्रँडस्लॅम चॅम्पियनशिपच्या दिशेने आगेकूच करण्यात यशस्वी ठरला. येथे जिंकल्यास त्याच्यासाठी हे 22 वे प्रतिष्ठेचे जेतेपद असेल.
या लढतीला उशिराने सुरुवात केली गेली, त्यावर नदाल व जोकोविच या दोघांनीही स्वतंत्र मते मांडली. ‘मंगळवारी रात्री 9 वाजता सुरु झालेला सामना मध्यरात्री 1 वाजता संपला. सामना अधिक लोकांनी पहावा, असा प्रयत्न असेल’, असे नदाल म्हणाला तर जोकोविचने सामन्याची वेळ टीव्हीच्या दृष्टिकोनातून ठरवली जाते, असे म्हटले. टेनिस ब्रॅकेटच्या दृष्टीने ही उपांत्यपूर्व फेरी होती. पण, प्रत्यक्षात ती फायनलसारखीच लढली गेली. फरक इतकाच राहिला की, विजेत्याला तातडीने चषक दिला गेला नाही!
शुक्रवारी 36 व्या वर्षात पदार्पण करत असलेल्या नदालची आता उपांत्य फेरीत तिसऱया मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हविरुद्ध होईल. नदालने पहिला सेट 6-2 अशा एकतर्फी फरकाने जिंकल्यानंतर जोकोव्हिचने दुसऱया सेटमध्ये 6-4 असा विजय मिळवत बरोबरी मिळवली, त्यावेळी ही लढत रंगतदार ठरणार, अशीच स्पष्ट चिन्हे होती. पण, नदालने त्यानंतर लागोपाठ सलग दोन सेट जिंकत जोकोविचचा संघर्ष संपुष्टात आणला.
‘मी आज माझ्यापेक्षा अव्वल खेळाडूविरुद्ध हरलो’, असे जोकोविच म्हणाला. वास्तविक, जोकोविच या लढतीपूर्वी उत्तम बहरात होता. त्याने सलग 22 सेट जिंकत आपले वर्चस्व अधोरेखित केले होते. पण, नदालविरुद्ध पहिल्या 49 मिनिटात त्याच्या वर्चस्वाला सुरुंग लागला.
उभयतातील 59 वी लढत
नदाल व जोकोविच यांच्यातील ही एकूण 59 वी लढत होती. त्यात नदालने जोकोविचची आघाडी 30-29 अशी कमी केली. याशिवाय, रोलँड गॅरोसमध्ये त्याने आपली हुकूमत 8-2 अशी आणखी भरभक्कम केली. हे दोन्ही खेळाडू यापूर्वी मागील वर्षातील उपांत्य फेरीत आमनेसामने भिडले आणि नदालने येथे बाजी मारली. या विजयासह जोकोविच 20 ग्रँडस्लॅमवरच असेल, याचीही नदालने तजवीज केली.
3 तास 18 मिनिटांच्या लढतीत व्हेरेव्हची बाजी

या स्पर्धेत पुरुष एकेरीतील आणखी एका उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या अलेक्झांडर व्हेरेव्हने स्पेनच्या कार्लोस अल्कारेझला 6-4, 6-4, 4-6, 7-6 (7) अशा फरकाने मात देत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. व्हेरेव्हने 3 तास 18 मिनिटे लढत देत हा विजय संपादन केला. येथील निकालासह त्याने मे महिन्याच्या प्रारंभी मुतूआ माद्रिद ओपन स्पर्धेतील कार्लोसविरुद्ध पराभवाचा हिशेबही चुकता केला. आता शुक्रवारी होणाऱया उपांत्य लढतीत व्हेरेव्हची उपांत्य लढत 13 वेळचा चॅम्पियन राफेल नदालविरुद्ध होईल.
यंदा उपांत्यपूर्व फेरीतील आणखी एका लढतीत जागतिक क्रमवारीतील द्वितीय मानांकित डॅनिल मेदवेदेव्हचे आव्हान मारिन सिलिकने संपुष्टात आणले होते. अन्य लढतीत इटालियन प्रतिस्पर्धी जॅन्निक सिन्नरने माघार घेतल्याने रुबलेव्हला पुढे चाल मिळाली. सिन्नरला चौथ्या फेरीतील सामन्यात तिसरा सेट सुरु असताना गुडघ्याच्या वेदना सुरु झाल्या आणि तो पुढे खेळू शकला नाही.
गुरुवारी डेन्मार्कचा होल्गर रुने उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेच्या कॅस्पर रुडविरुद्ध कोर्टवर उतरणार आहे. डेन्मार्कच्या होल्गरने चौथ्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासला 7-5, 3-6, 6-3, 6-4 अशा फरकाने मात दिली. या विजयासह त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान प्राप्त केले. आठवा मानांकित रुड हा यादरम्यान ग्रँडस्लॅम उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणारा नॉर्वेचा पहिलाच खेळाडू ठरला. त्याने बुधवारी हबर्टचे आव्हान 6-2, 6-3, 3-6, 6-3 अशा फरकाने संपुष्टात आणले.
पुरुष दुहेरीत मार्सेलो-होरॅसिओची उपांत्य फेरीत धडक
स्पेनचा मार्सेलो ग्रॅनोलर्स व अर्जेन्टिनाच होरॅसिओ झेबाल्लोसने पुरुष दुहेरीतील लढतीत डच खेळाडू वेस्ले कूलहॉफ व ब्रिटीश खेळाडू नील स्कप्स्की या जोडीला 3-6, 6-3, 6-4 अशा फरकाने विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. या जोडीने 1 तास 55 मिनिटांच्या खेळात पिछाडी भरुन काढत प्रतिस्पर्ध्याचे आव्हान संपुष्टात आणले. आज (गुरुवार दि. 2) होणाऱया उपांत्य लढतीत ही जोडी इव्हान-ऑस्टिन या क्रोएशियन-अमेरिकन जोडीविरुद्ध आव्हान उभे करतील.
अन्य एका उपांत्य सामन्यात भारताचा रोहन बोपण्णा व नेदरलँड्सचा मॅटवे मिडलकूप ही जोडी ईल साल्वादोरचा मार्सेलो ऍरेव्हालो व नेदरलँड्सचा जीन-ज्युलिएन रॉजर यांच्याविरुद्ध लढत देईल. उपांत्यपूर्व फेरीत बोपण्णा व मॅटवे यांनी ब्रिटनचा लॉईड ग्लासपूल व फिनलंडचा हॅरी हेलिओव्हारा यांचा पराभव केला.
महिला दुहेरीत सानिया-ल्युसीचे आव्हान संपुष्टात
या स्पर्धेच्या महिला दुहेरीत भारताची सानिया मिर्झा व झेकची ल्युसी या जोडीला कोको गॉफ व जेसिका पेगुला या अमेरिकन जोडीविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. तिसऱया फेरीतील लढतीत गॉफ-जेसिकाने 6-4, 6-3 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवला. पहिला सेट गमवावा लागल्यानंतर दुसऱया सेटमध्ये प्रारंभी सानिया व ल्युसीने प्रतिकार केला. पण, त्यात त्यांना फारसे यश लाभले नाही.









