वृत्तसंस्था / नवी दिल्ली
टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांना उत्कृष्ट नेतृत्वासाठी आणि कंपनीच्या चांगल्या कामगिरीसाठी ओळखले जाते. त्यांचा कार्यकाळ आणखी 5 वर्षांसाठी वाढवून देण्यात आलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एन. चंद्रशेखरन हे 2030 पर्यंत टाटा सन्सचे चेअरमन म्हणून पदावर कायम राहतील.
टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्यासह सर्व प्रमुख ट्रस्टींनी सर्वानुमते हा चंद्रशेखरन यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एन. चंद्रशेखरन यांच्याकडेच नेतृत्वाची धुरा कायम ठेवण्यात आलेली असून कंपनीच्या विकासासाठी त्यांच्याबाबत घेतलेला निर्णय हे एक महत्त्वाचे पाऊल होते, असे कंपनीने म्हटले आहे. टाटा ट्रस्टकडे टाटा सन्समध्ये 66 टक्के इतकी हिस्सेदारी आहे. समूहातील डिजिटल बदल, निर्मितीमध्ये वृद्धी आणि एअर इंडियाच्या पुनरुज्जीवनासाठी चंद्रशेखरन यांचे नेतृत्व महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने अनेक नव्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केलेली असून याचा फायदा समूहाच्या दुप्पट महसूल वाढीमध्ये दिसून आलेला आहे.









