अध्याय सत्ताविसावा
भगवंत उद्धवाला त्यांच्या पूजा स्थानाविषयी माहिती देत आहेत. ते म्हणाले, माझ्या प्रतिमेचे पूजन हेच माझे पहिले पूजास्थान आहे. उद्धवा! पाषाण, लाकूड, सुवर्ण, माती, चित्र, वाळू, मन आणि रत्न अशा वस्तूंचा वापर करून माझी मूर्ती तयार करता येते. विशेष म्हणजे त्यापैकी कोणत्याही साहित्याचा वापर करून तयार केलेल्या मूर्तीची पूजा केली असता त्या तत्काल पावतात आणि भक्ताचे कल्याण करतात. गंडकी नदीतील शाळीग्रामादि शिळेच्या मूर्ती-देवदार, मंदार किंवा ब्रह्मकाष्ठ (पिंपळ) इत्यादि, लाकडाच्या मूर्ती अथवा सुवर्णादि धातूंच्या मूर्ती ह्या साधकांना तत्काळ फळ देणाऱ्या असतात. तशाच माती, कापड, लुकण, यांच्याही मूर्ती करतात, त्यांना ‘लेप्या’ असे म्हणतात किंवा कोणी मोठ्या भक्तीने स्थंडिलावरही लिहून काढतात. त्यांना ‘लेख्या’ मूर्ती म्हणतात. वाळूची मूर्ती करतात तिला ‘ सिकतामूर्ती’ म्हणतात. तीही सोन्याच्या मूर्तीप्रमाणेच पूज्य होय. रत्नाची सुंदर मूर्ती, हिऱ्याची, नीलमण्याची, पद्मरागाची किंवा मोत्याची मूर्ती, ह्या सर्वप्रकारच्या मूर्तीही अत्यंत पूज्य होत. सर्व मूर्तीमध्ये अत्यंत श्रेष्ठ मूर्ती म्हटली म्हणजे ‘मनोमय’ मूर्ती. ती अत्यंत पवित्र होय. तिची उपासना केली असता साधकांना अत्यंत समाधान प्राप्त होते. आता ह्या प्रतिमांचे पूजन करण्याची पद्धत व चल-अचल लक्षण ह्याविषयीचेही निरूपण श्रीकृष्ण स्पष्ट करून पुढे सांगणार आहेत. ते म्हणतात, स्थिर आणि अस्थिर अशा दोन प्रकारच्या प्रतिमा हे माझे मंदिर होय. उद्धवा! स्थिर प्रतिमेची पूजा करताना दररोज आवाहन आणि विसर्जन करू नये. यावर उद्धव म्हणाला, देवा हे जरा उलगडून सांगा. देव म्हणाले, ऐक सांगतो. जो अचेतनाला चेतनत्व देतो, जडाला जीवत्व देतो तोच परमेश्वर होय. आगमशास्त्राच्या संमतीने स्थापन केलेल्या स्थावर-जंगम प्रतिमा म्हणजे शुद्ध भक्तिभावाने निर्माण केलेलं जीवाचे निज मंदिर समजावे. त्यात साधकाने ‘स्थावर’ मूर्तीचे पूजन केले असता, त्याचे आवाहन किंवा विसर्जन करावे लागत नाही कारण त्यांत स्वयंभू अधिष्ठान असते. अस्थिर प्रतिमेच्याबाबतीत आवाहन विसर्जन करावे किंवा करू नये परंतु वाळूच्या प्रतिमेचे मात्र केले पाहिजे. माती, चित्र इत्यादी प्रतिमांवर फुलाने पाणी शिंपडावे इतर सर्व प्रकारच्या मूर्तींना मात्र स्नान घालावे. ‘जंगम’ प्रतिमातसुद्धा आवाहन विसर्जन काहीमध्ये असते व काहीमध्ये नसते. तोही प्रकार ऐक. शाळीग्रामाच्या मूर्तीमध्ये माझे स्वयंभूच अधिष्ठान असते, त्यामुळे शाळीग्रामाला आवाहन व विसर्जन मुळीच लागत नाही. शाळीग्रामाचा फुटका तुकडा सुद्धा ज्याच्या पूजेला असेल, तेथे निज सखा परमात्मा सदा सर्वकाल नांदत असतो असे समजावे. ह्याशिवाय इतर जंगम म्हणजे चलमूर्ती आहेत, त्यांना आवाहन व विसर्जन लागू आहे. ते आपण साक्षेपाने करावे. हेच आगमोक्त विधिविधान होय. स्थंडिलावर काढलेल्या मूर्तीचे आवाहन करावे व पूजा होताच विसर्जन करावे. हृदयातील चिद्घन परमात्म्याचेच मूर्तीमध्ये आवाहन करावे आणि पूजा झाल्यावर त्याचे विसर्जन करून देवाला पुन्हा हृदयामध्ये ठेवावे. यात आपणच परिपूर्ण ब्रह्म आहोत हेच निजस्मरण होण्याकरिता आवाहन विसर्जन करावयाचे असते. त्यामुळे साधकाला आत्मस्वरूपाची आठवण राहते. आगमशास्त्रातील गूढार्थही हाच आहे की, आपणच आपला देव आहोत व आपणच आपले पूजक आहोत हे लक्षात घेतले म्हणजे, अशी आपल्या पूजेमध्ये आपल्याच आत्मस्वरूपाची ओळख होते. देव होऊनच देवाची पूजा करावी, हेच आत्मस्वरूपाचे गोड स्वरूप असून उपासनाकांडाच्या रूपाने श्रीकृष्णांनी उद्धवाला समजावून सांगितले. ही आत्मस्वरूपाची खरी गोडी पावलोपावली जर न मिळेल, तर उपासनेची कोरडी खटपट कोण सोसणार? हेच आगमशास्त्रातील गूढ रहस्य आहे. बा उद्धवा! ह्यायोगे साधक हे पावलोपावली सुखसंपन्न होऊन आपोआप चिद्घन बनतात अशी ही उपासना आहे.
क्रमश:








