पृथ्वीवर एक अनोखे सरोवर असून ते डांबराने निर्मित आहे. याचमुळे लोक याला आठवे आश्चर्यही मानतात. त्रिनिदादच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्यावरील ला ब्रीया पिच लेकला स्थानिक लोक जगातील आठवे आश्चर्य संबोधितात. हे सरोवर केवळ अद्भूत नसून आजही विज्ञानासाठी रहस्य ठरले आहे. हे सरोवर जगातील सर्वात मोठे नैसर्गिक डांबराची खाण असून याचे क्षेत्रफळ जवळपास 109 एकर आहे. जगात अशा केवळ तीनच ज्ञात जागा असून यात ला ब्रीया सर्वात विशाल आहे. यात जवळपास एक कोटी टन नैसर्गिक डांबराचा भांडार आहे.
सरोवराच्या पृष्ठभागाखाली सुक्ष्मजीव जिवंत असल्याचा खुलासा अलिकडेच युरोपीय अंतराळ संस्थेच्या अध्ययनातून झाला आहे. हे सुक्ष्मजीव कुठल्याही अन्य ग्रहावर जीवन शक्य आहे का हे जाणून घेण्यास मदत करू शकतात. येथून निघणाऱ्या डांबराचा वापर जगातील अनेक प्रसिद्ध स्थानांवर करण्यात आला आहे. बकिंघम पॅलेससमोरील रस्ता, ला गार्डिया एअरपोर्ट (न्यूयॉर्क), लिंकन टनेल (न्यूयॉर्कला न्यूजर्सीशी जोडणारा) या ठिकाणी येथील डांबराचा वापर झाला आहे. याचबरोबर अनेक देशांच्या रस्त्यांकरता येथील डांबर वापरण्यात आले आहे.
दूरून पाहिल्यास हे सरोवर एखादे विशाल, काळ्या पार्किंग लॉटप्रमाणे दिसते. परंतु पावसाळ्यात सरोवराच्या पृष्ठभागावर अनेक छोटेमोठे जलकुंड तयार होतात, ज्यात लोक पोहण्याचा आनंद घेतात. या जलकुंडांमध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते आणि स्थानिक लोक हे जीवनदायिनी फवारे असल्याचे मानतात जे त्वचेच्या समस्यांपासून सांधेदुखीवर उपयुक्त आहेत. 1595 मध्ये ब्रिटिश शोधकर्ते सर वॉल्टर रॅले यांनी या सरोवराचा शोध लावला होता, तेव्हा ते एल डोरोडोच्या शोधात होते. परंतु 1972 मध्ये स्पॅनिश लोकांनी सर्वप्रथम येथून डांबर मिळविण्यास सुरुवात केली आणि् याला टिएरा दी ब्रीया हे नाव दिले, जे नंतरच्या काळात ला ब्रीया झाले. स्थानिक अमेरिडियन समुदाय या सरोवराला देवतांचा प्रकोप मानत होते. येथील उत्खननात अनेक पुरातात्विक अवशेष मिळाले आहेत.









