तेलाचा दिवा अन् कवटींचा समावेश
इस्रायलच्या जेरूसलेममध्ये पुरातत्वतज्ञांना एक प्राचीन द्वार मिळाले आहे. हजारो वर्षे जुया या गुहेत जेव्हा वैज्ञानिक पोहोचले तेव्हा ते चकित झाले. या गुहेत तेलाचे दिवे, कवटी, नाणी अन् कलाकृती दिसून आल्या. हार्वर्ड थियोलॉजकल रिह्यूमध्ये प्रकाशित एका अध्ययनानुसार रोमन युगात नेक्रोमेंसी किंवा मृत्यू जादूच्या प्राचीन प्रथेविषयी माहिती देणारे पुरावे येथे मिळाले आहेत. येथे लोकांच्या आत्म्यांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न व्हायचा.
जेरूसलेमपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर पर्वतांमध्ये टेओमिम गुहा असून याचे अध्ययन 1873 पासून केले जात आहे. येथे वाहणाऱ्या भूमिगत झऱ्याच्या पाण्याचा वापर लोक उपचारासाठी करायचे. ख्रिस्तपूर्व 4000 साली येथे लोकांचे वास्तव्य होते असे तज्ञांचे मानणे आहे. या ठिकाणाचा वापर मृत लोकांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नाकरता केला जात होता. म्हणजेच एक प्रकारे तंत्रविद्येचा येथे वापर होत होता. दुसऱ्या शतकात कोखबा विद्रोहादरम्यान या गुहेचा वापर ज्यू लोकांनी लपून राहण्यासाठी केला होता. ही गुहा अत्यंत खोलवर असल्याने याचे कनेक्शन मृत्यूच्या जगाशी असल्याचे मानले जाते.
जेरूसलेमच्या हिब्रू विद्यापीठात गुहा संशोधन केंद्राच्या सहकार्याने पुरातत्व तज्ञ या गुहेचे उत्खनन करत आहेत. त्यांना येथे अनेक अनपेक्षित गोष्टी सापडल्या आहेत. यात तीन मानवी कवट्यांचे तुकडे, 120 दिवे, प्राचीन मातीची भांडी, कांस्य युगातील अस्त्रही सापडले आहे. या सर्व गोष्टींना व्यवस्थितपणे दगडांच्या भेगांमध्ये लपविण्यात आले होते. येथे नव्या मूर्तिपूजक लोक राहण्यास आल्यावर नेक्रोमेंसीची प्रथा सुरू झाली असावी असे बार इलान विद्यापीठाचे पुरातत्व तज्ञ आणि या अध्ययनाचे सह-लेखक डॉ. बोअज जिस्सू यांनी सांगितले आहे.
गुहेत नेक्रोमेंसी प्रथा
रोमन काळात गुहेत नेक्रोमेंसी समारंभ व्हायचे. येथे देवतांना आवाहन केले जात होते. कोखबा विद्रोहाच्या पतनानंतर या पूर्ण क्षेत्रात मोठे परिवर्तन घडले. पूर्वी हे एक ज्यू क्षेत्र होते, परंतु नंतर रोमन साम्राज्याने येथील बहुतांश ज्यू लोकांना ठार केले किंवा विस्थापित केले. याच लोकांकडून हा विधी केला जात होता. याचमुळे या दुर्गम गुहेला आत्म्याशी संपर्काचे द्वार मानले गेले. येथील लोकांचा उद्देश भविष्यवाणी करणे आणि आत्म्यांना जागृत करणे होता असे वैज्ञानिकांचे मानणे आहे.









