सरोवरात शेकडो सांगाडे, 1 हजार वर्षांपेक्षाही जुने
भारतातील एक सरोवर अत्यंत सुंदर असले तरीही ज्यावेळी तुम्हाला याची वस्तुस्थिती समजेल, तेव्हा नक्कीच धक्का बसेल. या सरोवराचे नाव रुपकुंड असून हे उत्तराखंडमध्ये आहे. हिमालयाचे सौंदर्य, तेथील गोष्टी सर्वकाही स्वप्नवत वाटते. हजारो लोक हिमालयातील पर्यटनस्थळी पोहोचत असतात. परंतु येथे एक असे सरोवर आहे, जेथे लोक जाण्याचे धाडस करतात, परंतु तेथे पोहोचताच त्यांना भीतीची जाणीव होते.
या सरोवराला ‘लेक ऑफ स्केलेटन्स’ देखील म्हटले जाते. रुपकुंड सरोवर समुद्रसपाटीपासून सुमारे 16,500 फुटांच्या उंचीवर आहे. हे सरोवर त्रिशुल पर्वताच्या सखल भागात आहे. सरोवर काही अंतरावरून पाहिल्यास अत्यंत मोहक वाटते, परंतु याच्या आत डोकावल्यास हादरून जायला होते, कारण या सरोवरात शेकडो सांगाडे दिसून येतात.
हे सरोवर

वर्षभर गोठलेले असते, परंतु हवामानानुसार हे सरोवर विघळत असते आणि याचा आकार लहान आणि मोठा होत असतो. उन्हाळ्यात येथील बर्फ वितळतो आणि मग त्यातील सांगाडे दिसून येतात. परंतु हिवाळ्यात हे सांगाडे दिसून येत नाहीत. या सरोवरात आतापर्यंत 600-800 जणांचे सांगाडे आढळून आले आहेत. बर्फात दाबून राहिल्याने यातील काही सांगाड्यांवर अद्याप मांस देखील आहे. सरकार या सरोवराला रहस्यमय ठरविते, तर अद्याप याविषयी लोकांना पूर्णपणे माहिती देण्यात आलेली नाही. अहवालानुसार 1942 मध्ये सर्वप्रथम ब्रिटिश रेंजर्सना येथे सांगाडे दिसून आले होते.
येथील हाडं अन् सांगाड्यांबद्दल अनेक प्रकारच्या कहाण्या प्रचलित आहेत. त्यातील किती खऱ्या आणि किती अफवा हे कळणे अशक्य आहे. 2004 मध्ये वैज्ञानिकांनी कार्बन डेटिंगद्वारे ही हाडं 1 हजार वर्षांपेक्षाही जुन्या काळातील लोकांची असल्याचे शोधून काढले होते, ही सर्व हाडं अन् सांगाडे ज्या लोकांचे आहेत, ते एकाचवेळी मृत्युमुखी पडलेले नाहीत, तर वेगवेगळ्या वेळी त्यांचा मृत्यू झाला होता, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
इडोअनिन हार्ने या वैज्ञानिकाने या सरोवराशी निगडित एक माहिती दिली आहे. त्यांच्यानुसार या सर्वांचे मृत्यू कुठल्याही एका दुर्घटनेत झालेले नसावेत. तर वेगवेगळ्या दुर्घटनांमुळे त्यांचे मृत्यू झाले असावेत असे त्यांचे सांगणे आहे. भारत-चीन युद्धादरम्यान मारले गेलेल्या चिनी सैनिकांचे हे सांगाडे असल्याचा अनेक लोकांचा दावा आहे, परंतु सत्य काय हे कुणीच जाणत नाही.









