आमच्या आसपास अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात, यातील काही आमच्यासाठी चांगले तर काही वाईट असतात. चनीच्या टियांगोंग अंतराळ स्थानकावर वैज्ञानिकांना एक असा बॅक्टेरिया मिळाला आहे, जो अत्यंत रहस्यमय आहे. हा शोध अंतराळवीरांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. अखेर हा बॅक्टेरिया आला कुठून आणि अंतराळवीरांसाठी हा धोका ठरू शकतो का असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
चीनच्या टियांगोंग अंतराळ स्थानकावर मिळालेला हा बॅक्टेरिया प्रतिकूल स्थितीतही तग धरून राहू शकतो. या बॅक्टेरियाचे नाव नोवोहर्बासिलम टियांगोंगेंसिस ठेवण्यात आले आहे. शेनझोऊ स्पेस बायोटक्नॉलॉजी ग्रूप आणि बीजिंग इन्स्टीट्यूट ऑफ स्पेसक्राफ्ट सिस्टीम इंजिनियरिंगच्या वैज्ञानिकांनुसार हा बॅक्टेरिया अंतराळस्थानकावर कसा पोहोचला या रहस्याची अद्याप उकल झालेली नाही.
बॅक्टेरिया अंतराळात कसा तग धरू शकला हा देखील प्रश्नच आहे. पृथ्वीवरून एखाद्या बिजाणूच्या (स्पोर) स्वरुपात अंतराळात पोहोचला का? अंतराळ स्थानकाच्या खास वातावरणातच याचा जन्म झाला या प्रश्नाचे उत्तर वैज्ञानिकांकडे देखील नाही. अलिकडेच एका मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार हा नवा बॅक्टेरिया जेलाटिनला तोडून त्यातून नायट्रोजन आणि कार्बन मिळवू शकते. याचमुळे हा बॅक्टेरिया प्रतिकूल स्थितीतही स्वत:वर एक मजबूत सुरक्षा कवच निर्माण करतो. या बॅक्टेरियाची एक प्रजाती पृथ्वीवरही अस्तित्वात आहे. जी कमकुवत इम्युन सिस्टीम असलेल्या लोकांमध्ये सेप्सिस सारखे धोकादायक आजार फैलावू शकते. पृथ्वीवर असलेल्या याच्या प्रजातीचा बॅक्टेरिया दुसऱ्या गोष्टींना खाऊन जिवंत राहतो. परंतु अंतराळातील बॅक्टेरिया केवळ जेलाटिनवर निर्भर आहे. ही नवी शक्ती आणि याच्याशी संबंधित प्रजातींचे धोकादायक स्वरुप पाहून वैज्ञानिक चिंतेत आहेत.अंतराळस्थानकावर अंतराळवीर पृष्ठभागाला नियमित स्वरुपात सॅनिटाइज करतात आणि बॅक्टेरियावर करडी नजर ठेवून असतात. अंतराळ स्थानकात हवा साफ करण्यासाठी खास फिल्टर सिस्टीम आहे, तरीही पृथ्वीप्रमाणे अंतराळातही बॅक्टेरियांपासून होणारे आजार पूर्णपणे रोखणे अवघड आहे. आता या नव्या बॅक्टेरियामुळे काय घडू शकते हे पुढील काळात स्पष्ट होणार आहे.









