‘बुक ऑफ द डेड’चा शोध
इजिप्तच्या पुरातत्व तज्ञांनी 3500 वर्षे जुन्या दफनभूमीचा शोध लावला आहे. यात अनेक ममी, मूर्ती आणि अन्य महत्त्वपूर्ण सामग्री मिळाली आहे. या शोधात सर्वात खास बुक ऑफ द डेड म्हणजेच मृतांच्या पुस्तकाची प्रत सामील आहे. हे एका 43 फूट लांब पपीरस स्क्रॉलवर लिहिण्यात आले असून हा दुर्लभ आणि महत्त्वपूर्ण शोध आहे. याला प्राचीन इजिप्तच्या ग्रंथांचा संग्रह मानला जातो. जीवन आणि आत्म्याच्या मार्गदर्शनाशी याला जोडले जातेय. प्राचीन इजिप्तवासीय निश्चितपणे दफन करण्याची विधी काय असते हे जाणून होते असे या शोधानंतर म्हटले जातेय. यात मृतांच्या अवयवांना ठेवण्यासाठी पॅनोपिक जार आणि बुक ऑफ द डेडवरील स्क्रॉल सामील होते. मृताला परलोकात पुढे जाण्यासाठी मदत मिळावी या उद्देशाने हा प्रकार केला जात होता.
मध्य इजिप्तमध्ये शोधण्यात आलेली 3500 वर्षे जुनी ही दफनभूमी ममी, ताबीज, मूर्ती, कॅनोपिक जार आणि 43 फूट लांब पपीरस स्क्रॉलने भरलेली आहे. हा स्क्रॉल अल-गुरैफा क्षेत्रात आढळून आलेले पहिले पूर्ण पपीरस आहे. इजिप्तच्या सर्वोच्च पुरातत्व परिषदेचे महासचिव मुस्तफा वजीरी यांनी याची माहिती दिली आहे.
ही दफनभूमी ख्रिस्तपूर्व 1550 ते 1070 दरम्यानची आहे. येथील बुक ऑफ द डेडच्या शोधामुळे तज्ञांचे लक्ष आकर्षित झाले आहे. या पुस्तकाला 43-49 फूट लांब मानले जाते. जर हे पुस्तक इतके लांब आणि चांगल्याप्रकारे संरक्षित असेल तर निश्चितपणे हा आकर्षक आणि रंजक शोध असल्याचे उद्गार जर्मनीच्या रोमर आणि पेलिजेअस संग्रहालयाच्या सीईओ लारा वीस यांनी काढले आहेत. ज्या दफनभूमीत याला मूळ स्वरुपात दफन करण्यात आले, तेथे याची प्रत मिळणे हे अत्यंत दुर्लभ असल्याचे वक्तव्य शिकागो विद्यापीठाचे पुरातत्वतज्ञ फॉय स्कॉल्फ यांनी केले आहे.









