शहर-उपनगरात घरफोडींचे सत्र सुरूच : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
बेळगाव : शहर आणि उपनगरात गेल्या 20 दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरांचे काडीकोयंडा व कुलूप तोडून चोऱ्या केल्या जात आहेत. आतापर्यंतच्या घडलेल्या घटनांमध्ये साम्य आढळून आले असून यामागे ‘म्हैसूर टोळी’ कार्यरत असल्याचा सुगावा पोलिसांना मिळाला आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी जाळे विणले आहे. एका पाठोपाठ एक दररोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत आहेत. विशेषकरून चोरट्यांनी बंद घरांना आपले लक्ष्य बनविल्याचे दिसून येत आहे. दर्शनी, तसेच पाठीमागचा दरवाजा फोडून आत प्रवेश केल्यानंतर कपाटातील दागिने व रोख रक्कम पळविली जात आहे. दररोज चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्यासह असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. घर बंद करून जाताना नागरिकांना विचार करण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी घराला कुलूप घालून बाहेर जाताना संबंधित पोलीस स्थानकाला याची कल्पना देण्यात यावी, असे सांगितले जात होते.
त्यानंतर बीट पोलिसांकडून त्या भागात गस्त घातली जात होती. मात्र ही योजना गुंडाळण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर दिवसा, तसेच रात्रीच्यावेळी विविध ठिकाणी पोलिसांनी गस्त घालणे गरजेचे आहे. पण पोलिसांची गस्त कमी झाली असल्याने चोरट्यांना मोकळे रान मिळाले आहे. सातत्याने चोरीच्या घटना घडत असल्याने एकप्रकारे चोरट्यांनी पोलिसांनाच आव्हान दिल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांचा वरचष्मा वाढल्याने पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक संपुष्टात आला आहे का? असा सवालदेखील आता उपस्थित केला जात आहे.
कारण चोरटे मनाला येईल त्या ठिकाणी अगदी बिनधास्तपणे घरफोडी करत आहेत. गेल्या 20 दिवसांत 35 हून अधिक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर मोटारसायकलींच्या चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्थानकनिहाय काळ्यायादीतील गुन्हेगारांना बोलावून त्यांची चौकशी केली जात आहे. मात्र, या 20 दिवसांत घडलेल्या चोरीच्या घटनांमध्ये स्थानिक गुन्हेगार सक्रिय नसल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कारण आजपर्यंतच्या घडलेल्या घटनांमध्ये साम्य आढळून आले असून यामागे ‘म्हैसूर टोळी’ सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. तातडीने चोरट्यांना अटक केल्यास पोलीस खाते बेळगावकरांचा विश्वास संपादन करण्यास पात्र ठरणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता चोर शिरजोर बनल्याचे दिसून येत आहे. पोलीस यंत्रणा कूचकामी ठरली आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न
शहर व उपनगरात घडत असलेल्या घरफोडींच्या घटनांचा तपास करण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. आजपर्यंतच्या घडलेल्या घटनांचा बारकाईने अभ्यास केला असता यामागे ‘म्हैसूर टोळी’ कार्यरत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यानुसार चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. लवकरच चोरट्यांना जेरबंद करण्यात यश येईल.
– निरंजनराजे अरस, पोलीस उपायुक्त (गुन्हे व वाहतूक शाखा)










