विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली : 22 रोजी उत्सवाला चालना
प्रतिनिधी/ बेंगळूर
विश्वविख्यात म्हैसूर दसरा उत्सवाच्या उद्घाटनासाठी बूकर पुरस्कार विजेत्या बानू मुश्ताक यांना आमंत्रित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. यामुळे साहित्यिक बानू मुश्ताक यांना दसरोत्सवाचे उद्घाटन करण्यापासून रोखणारा कायदेशीर अडसर दूर झाला आहे. सोमवार 22 सप्टेंबर रोजी चामुंडी टेकडीवर म्हैसूर जिल्हा प्रशासनाकडून आयोजिलेल्या दसरोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
बानू मुश्ताक यांना दसरोत्सवाच्या उद्घाटनासाठी निमंत्रण दिल्याने सरकारच्या या निर्णयाविरोधात म्हैसूरचे माजी खासदार प्रतापसिंह व इतरांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. न्यायालयाने 15 सप्टेंबर रोजी या याचिका फेटाळून लावल्या होत्या. दसरा उत्सव हा राज्य सरकारद्वारे प्रायोजित सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्यात हिंदूव्यतिरिक्त अन्य धर्मियांचा सहभाग कोणत्याही घटनात्मक अधिकाराचे उल्लंघन ठरत नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यामुळे प्रतापसिंह यांच्यावतीने बेंगळूरमधील एच. एस. गौरव यांनी यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर शुक्रवारी सकाळी सुनावणी झाली. न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यामूर्ती संदीप मेहता यांच्या द्विसदस्यीय पीठाने ही याचिका फेटाळली असून पुढील सुनावणीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले.
सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांया फटकारले. संविधानाची प्रस्तावना काय सांगते? आपण धर्मनिरपेक्षता तत्व स्वीकारल्यामुळे या याचिकेच विचार करण्याची आवश्यकता आहे का? याचिकेवरील तातडीच्या सुनावणी यादीत समावेश करण्याच्या विनंतीविषयी न्यायालयाने आश्चर्यही व्यक्त केले. इतकी निकडीची गरज आहे का?, ही जनहिताची याचिका आहे का?, असे प्रश्न न्यायालयाने उपस्थित केले.
याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी बचाव करताना, हा फीत कापण्याचा कार्यक्रम नाही. सरकारी कार्यक्रमही नाही. पूर्णपणे धार्मिक उत्सव आहे. आतापर्यंत दसरा हिंदू धर्माशी संबंधित व्यक्तींनीच उद्घाटन केले आहे, असे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा न्यायाधीशांनी, तुम्ही संविधानाची प्रस्तावना वाचली आहे की नाही? किंवा ते तुम्हाला समजले नसल्याचे दिसून येते. आम्ही ते सांगायची गरज आहे का? कोणत्या आधारावर तुम्ही ही याचिका दाखल केली?, अशा परखड शब्दात न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या वकिलांना सुनावले.
दरम्यान, पुन्हा याचिकाकर्त्यांनी समर्थन करण्याचा प्रयत्न करताच न्यायालयाने ही याचिका सुनावणीसाठी योग्य नाही, त्यामुळे तुमची याचिका फेटाळत असल्याचे स्पष्ट केले. याच दसरा उत्सवाचे उद्घाटन लेखक निसार अहमद यांच्या हस्ते झाले होते. जर त्यावेळी विरोध नव्हता तर आता कशाला? आम्ही धर्माच्या आधारावर निर्णय घेऊ शकत नाही, असे सांगून न्यायाधीशांनी याचिका फेटाळून लावली.
यापूर्वी उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या कोणत्याही हक्काचे उल्लंघन झाले नाही, असा आदेश देत याचिका फेटाळून लावली होती. उच्च न्यायालयाने चुकीचा निकाल दिला आहे. बानू मुश्ताक यांनी हिंदूविरोधी वक्तव्ये केल्याने त्यांच दसरोत्सव उद्घाटनातील सहभाग जनतेच्या भावना दुखावणाऱ्या ठरतील, असा युक्तिवादही सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला. मात्र, न्यायालयाने यापैकी कोणत्याही मुद्द्याचे समर्थन केले नाही.









