केंद्रीय गुप्तचर यंत्रणेची धक्कादायक माहिती : राज्याला सतर्कतेची सूचना : सांस्कृतिक नगरीत सुरक्षेत वाढ
प्रतिनिधी/ बेंगळूर
जगप्रसिद्ध म्हैसूर दसरोत्सवात घातपात घडविण्याचा कट दहशतवाद्यांनी रचल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय गुप्तचर यंत्रणेला मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याला सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे दसरा उत्सव काळात कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत, यासाठी सांस्कृतिक नगरी म्हैसूरमध्ये राज्याच्या गृहखात्याकडून अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तसेच मंगळूरमधील कुद्रोळी, गोकर्णनाथ मंदिर परिसरासह प्रमुख ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणने बनावट पासपोर्ट बनवून 70 जणांनी देशात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याची माहिती संकलित करून राज्य सरकारला पाठवली आहे. जम्बो सवारी मिरवणुकीसाठी केवळ दोनच दिवस शिल्लक असताना म्हैसूर नगरीवर दहशतवाद्यांचे सावट पडले आहे. एकीकडे भारतात विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे तर दुसरीकडे म्हैसूरमध्ये जगप्रसिद्ध दसरा महोत्सव सुरू आहे. मात्र, म्हैसूरमध्ये दहशतवाद्यांचे सावट असल्याची माहिती मिळाल्यानंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
जगप्रसिद्ध म्हैसूर दसऱ्याचे साक्षीदार होण्यासाठी देशासह राज्याबाहेरून लाखो पर्यटक सांस्कृतिक नगरीत दाखल झाले आहेत. त्यामुळे कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बंदोबस्त वाढविण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. म्हैसूरवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी पडल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक (डीजी-आयजीपी) अलोक मोहन यांनी रविवारी सकाळी 9 वाजता तात्काळ 40 सीएआर तुकडी, 30 राज्य राखीव दलाच्या तुकडींसह 1568 अतिरिक्त पोलीस तैनात केले आहेत.
संवेदनशील भागात अधिक खबरदारी घेऊन देश-विदेशातील तसेच राज्याबाहेरील लाखो पर्यटकांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. रेल्वेस्थानक, बस स्थानकांसह दाट लोकवस्तीच्या भागात संशयास्पद व्यक्ती आणि वस्तूंची तपासणी तीव्र करण्यात आली आहे. प्रत्येकवेळी दसऱ्यासाठी 1700 ते 2000 पोलीस तैनात असतात. मात्र, यावेळी सुरक्षेसाठी 3500 हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. श्रीरंगपट्टना, कृष्णराज जलाशय परिसरातही पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.