बॉलिवूडमध्ये माझ्या नात्यातील कुणीच नाही
आहना कुमराचे ‘लॉकडाउन इंडिया’ आणि ‘सलाम वेंकी’ हे दोन चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाले आहे. एका चित्रपटात आहनाने वैमानिकाची भूमिका साकारली आहे, तर सलाम वेंकी चित्रपटात ती पत्रकार झाली आहे. ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ चित्रपटाद्वारे प्रकाशझोतात आलेली आहना अनेक वर्षांनंतरही चित्रपटसृष्टीत स्थिरावण्याचा संघर्ष सुरू असल्याचे सांगते.
एक आउडसाइडर असल्याने माझा संघर्ष कायमच सुरू राहणार आहे. स्वतःचे स्थान निर्माण करण्याची धडपड कायम राहणार आहे. आमच्यासारख्या कलाकारांचा बॉलिवूडमध्ये कुणीच काका, मामा, आत्या, भाचा नाही. याचमुळे आमच्यासाठी कुणीच शब्द टाकू शकत नाही. बॉलिवूडमध्ये अमूक व्यक्तीसाठी दिग्दर्शक-निर्मात्याकडे फोन कॉल्स जात असल्याचे आम्ही पाहत असतो असे आहनाने म्हटले आहे.
परंतु जर तुम्ही एकदा चांगल्या लोकांसोबत जोडले गेल्यास तुमची वाटचाल सोपी ठरते. माझ्या संघर्षात मी चांगल्या लोकांशी जोडली गेली हे माझे सुदैव. आमच्यासारख्या आउटसाइडरला एक संधी मिळविण्याकरता 10-15 वर्षे लागतात. आमच्यासाठी दिग्दर्शक, निर्मात्यापर्यंत पोहोचणेच अवघड असते. चित्रपटसृष्टीत कुणीच कुणाचा मित्र नसतो, हे सर्व सह-कलाकार असतात असे आहनाचे म्हणणे आहे.









