वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
उसेन बोल्ट आठ वर्षांनंतर येत्या ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन करणार आहे. परंतु स्पर्धकांनी काळजी करण्याची गरज नाही. कारण जगातील ही सर्वांत वेगवान व्यक्ती पॅरिसमध्ये फक्त लढती पाहण्यासाठी आणि आपले अभूतपूर्व विक्रम शाबूत राहतात की नाही हे पाहण्यासाठी हजेरी लावेल. मात्र नजीकच्या भविष्यात तरी आपल्या विक्रमांना धोका नाही, असा विश्वास त्याला आहे.
न्यूयॉर्कमधून फोनवर त्याने ही मुलाखत दिली. तिथे तो सध्या पुढील महिन्यात होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकाचा दूत म्हणून प्रचार करत आहे, 2009 च्या बर्लिन येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने नोंदविलेले 9.58 सेकंद (100 मीटर) आणि 19.19 सेकंद (200 मीटर) हे विक्रम तेव्हापासून निर्धोक राहिलेले आहे. ‘मला माझे विक्रम धोक्यात आहेत असे वाटत नाही. मला वाटते की, अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. मला खरोखरच कोणीही विक्रम मोडेल असे वाटत नाही. त्यामुळे मला वाटते की, स्पर्धेत जाण्याच्या दृष्टीने माझ्याकडे अजून काही वर्षे आहेत’, असे बोल्ट म्हणाला. सलग तीन ऑलिम्पिकमध्ये 100 मीटर आणि 200 मीटर अशी दोन्ही सुवर्णपदके जिंकणारा तो एकमेव धावपटू आहे.
मी शर्यतीच्या बाबतीत आता काय चालले आहे ते पाहत आहे. अॅथलीट्स वेळा कमी करत आहेत, असे बोल्टने सांगितले. बोल्ट आता एक कौटुंबिक माणूस आहे आणि त्याच्या विविध व्यावसायिक बांधिलकी त्याला जगभर फिरवत आहेत. पॅरिसमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्या कामगिरीचा मागोवा घेण्यासही तो उत्सुक आहे. बोल्टने जवळपास दशकभरापूर्वी भारताला शेवटचा दौरा केला होता आणि नजीकच्या भविष्यात परत येण्याची त्याला आशा आहे. ‘मला माहीत आहे की, माझे बरेच भारतीय चाहते आहेत आणि मला खूप टॅग सोशल मीडियावर मिळतात. म्हणून मला त्या समर्थनाबद्दल धन्यवाद म्हणायचे आहे. मी नजीकच्या भविष्यात पुन्हा तिथे येण्यास उत्सुक आहे’, असे तो म्हणाला.









