अभिषेक बॅनर्जींवर ममतादीदींचा अंकुश
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये सत्तारुढ तृणमूल काँग्रेसमध्ये जुन्या आणि नव्या नेतृत्वादरम्यान वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पक्ष अध्यक्ष आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रशासकीय आणि संघटनात्मक प्रकरणांमध्ये माझाच निर्णय अंतिम राहणार असल्याचा स्पष्ट संकेत दिला आहे. अलिकडच्या काळात राज्यांमध्ये घडलेल्या घटनांनी ममता बॅनर्जी यांची ही भूमिका अधिकच ठोस ठरली आहे. ममतांनी बुधवारी सीआयडी प्रमुख आर. राजशेखरन यांना पदावरून हटविले आणि त्यांची अन्य पदावर बदली केली होती.
भ्रष्टाचारात सामील लोकांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे, भले मग त्यांची राजकीय ओळख कुठलीही असो असे ममतांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना म्हटले होते. तसेच त्यांनी सीआयडीची पूर्णपणे पुनर्रचना केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते.
20 नोव्हेंबर रोजी कोलकात्यात तृणमूल नगरसेवक सुशांत घोष यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पक्षाच्या काही वरिष्ट नेत्यांनी (कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम आणि खासदार सौगत रॉय) पोलिसांवर टीका केली होती. पक्षाचे महासचिव आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री केले जावी अशी मागणी भरतपूर येथील आमदार आणि माजी मंत्री हुमायूं कबीर यांनी जाहीरपणे केली होती. यानंतर पक्षाच्या जुन्या आणि नव्या गटामधील तणाव आणखी वाढला होता.
तर 25 नोव्हेंबर रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ममतांनी अनेक एकनिष्ठ नेत्यांना कार्यकारी समितीत सामील केले होते. पक्षाच्या संसदीय प्रकरणांशी संबंधित निर्णय वरिष्ठ नेते म्हणजेच सुदीप बॅनर्जी, कल्याण बॅनर्जी आणि डेरेक ओ ब्रायन यांच्याकडून घेतले जातील असे ममतांनी स्पष्ट केले आहे.
अभिषेक बॅनर्जींवरून वाद
अभिषेक बॅनर्जी यांना अतिरिक्त भूमिका देत त्यांना पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते करण्यात आले आहे. परंतु पक्षाच्या प्रशासकीय विषयांवरील त्यांचा प्रभाव मर्यादित करण्यात आला आहे. तसेच पक्षांतर्गत शिस्त वाढविण्यासाठी तीन शिस्तपालन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. पक्षातील जुन्या नेत्यांच्या गटाने अभिषेक यांची नेतृत्व शैली आणि संघटनात्मक बदलांच्या शिफारसींवर आक्षेप घेतला होता. अभिषेक यांनी कामगिरीच्या आधारावर जिल्हाध्यक्षांना बदलण्यात यावे अशी भूमिका मांडली होती.
भाजपकडून लक्ष्य
तृणमूल काँग्रेसमध्ये अभिषेक बॅनर्जी यांचा प्रभाव वाढला आहे. आता ममता बॅनर्जी त्यांचे पंख छाटू पाहत आहेत अशी टीका भाजप नेते राहुल सिन्हा यांनी केली आहे. तर ममतादीदी आणि त्यांच्या भाच्यामधील संघर्ष आता उघड झाला आहे. ममतादीदी आता अभिषेक यांना नियंत्रित करू पाहत आहेत, परंतु हे शक्य नाही असे काँग्रेस नेत्या सौम्या रॉय यांनी म्हटले आहे.









