अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा देहाचा अभिमान घालवण्यासाठी माझी भक्ती करणे हाच एकमेव उपाय आहे. भक्तीतून काय मिळते, असे विचारशील तर ज्ञान, वैराग्य, निवृत्ती, धृती, शांती, ब्रह्मस्थिती हे सर्व भक्ती केल्याने प्राप्त होते. एव्हढेच काय चारही मुक्तींच्या वरती भक्तीचे स्थान आहे. अशी माझ्या भक्तीची अनिवार शक्ती असल्याने जो माझी भक्ती करतो त्याला मी वश झालोच म्हणून समज. माझ्या भक्तांवर माझे इतके प्रेम असते की, त्यांच्या दारात मी तिष्ठत उभा असतो. मी पूर्णपणे भक्ताच्या आधीन असतो. माझ्या भक्तीचा महिमा एव्हढा आहे की, चारही मुक्ती माझ्या भक्ताच्या पायाशी लोळण घेत असतात. त्यामुळे जो माझी भक्ती करतो तो धन्य होतो. म्हणून जो माझी भक्ती करतो त्याला मी सर्वस्वी विकला जातो. भक्ती हेच देहाचा अभिमान घालवण्यासाठी मुख्य साधन असल्याने जो भक्त माझी निस्सीम भक्ती करत असतो त्याच्या मी आधीन होऊन राहतो. तो सांगेल त्याप्रमाणे वागतो. त्याच्या वचनाचे मी कधीच कणभरही उल्लंघन करत नाही. त्यांनी जर मला सगुण हो असे सांगितले तर मी त्यांच्यासाठी सिंह, वराह अशी रूपे घेतो. मी स्वत: विदेही असलो तरी त्यांच्यासाठी मी देहधारी होतो. ह्याची कितीतरी उदाहरणे देता येतील. राजा अंबरीषासाठी मी दहा जन्म सोसले, खरं तर मला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही पण भक्ताला उणेपणा येऊ नये म्हणून मी गर्भवास सोसले. द्रौपदीचे वस्त्रहरण करायचा कौरवांनी चंग बांधला होता पण तिच्या हाकेला धावून जाऊन मी तिला वस्त्रs पुरवून तिळभरसुद्धा उघडी पडून दिली नाही. भक्तांना मी नेहमीच मदत करत असतो. मी अजन्मा असून त्यांच्यासाठी जन्म घेतो. शत्रूमित्रांनाही सारखीच वागणूक देतो. सदैव भक्तांचा कैवार घेतो. जो माझ्या भक्तांचे हित करत असतो तो माझा परम मित्र होतो. त्याचबरोबर जो माझ्या भक्तांशी वैर करतो त्याचे मी नानाप्रकारे निर्दालन करतो. भक्तांना मी नेहमीच सहाय्य करत असतो. माझे भजन न करणारे अभागी जन मात्र अध:पतन पावतात. इथं तुला अशी एक शंका येईल की मनात जर पापाचे विचार असतील, चोऱ्या कराव्यात, लोकांना त्रास द्यावा, दमदाटी करावी असे वाटत असणाऱ्यांच्याकडून माझे भजन कसे घडेल? तर त्याचे उत्तर ऐक, ज्यांना माझे भजन करावे असे खरोखरच वाटत असेल त्यांनी मनात नुसता तसा विचार आणून माझी आठवण काढली तरी त्यांच्या पापांच्या राशी मी क्षणात नष्ट करतो. जे सतत माझ्या नामाचा गजर करतील त्यांच्या महापातकांचा मी संहार करतो. माझ्या नामापाशी महापापाला बिलकुल थारा मिळत नाही. माझे नाम हे ब्रह्मास्त्रासारखे काम करते. त्यामुळे त्याच्यापुढे महापाप मुंगीसारखे असल्याने नामापुढे उभारण्याची त्याच्या अंगी बिलकुल ताकद नसते. माझ्या नामाचाच जर एव्हढा प्रताप आहे तर माझी भक्ती किती शक्तिशाली असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. माझ्या भक्तीचा ठसा एकदा उमटला की, तो कलीकाळालाही नागवून सोडतो. मग देहाभिमानाची काय कथा? माझ्या नामाची शक्ती देहाभिमान समूळ नाहीसा करते. आणखीन सांगायचे म्हणजे माझ्या भजनाखेरीज अन्य कोणत्याही उपायाने देहाभिमान नाहीसा होत नाही. ज्यामुळे देहाभिमान नाहीसा होतो ते माझे भजन कसे करतात किंवा देहाभिमान नाहीसा होण्यासाठी माझे भजन कसे करावे असे विचारशील तर सांगतो ऐक, देहाभिमान नाहीसा व्हावा असे वाटत असेल तर अभेदभावाने माझी भक्ती करावी. भगवंतानी सांगितलेले बोल ज्ञानेश्वरीत सांगताना माउली म्हणतात, जे जे भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत । हा भक्तियोगु निश्चित। जाण माझा ।। 10.118।। जे जे भेटिजे भूत ते ते मानिजे भगवंत हे ज्यांना समजलंय आणि अंमलात आणायला जमतंय त्यांच्याच अहंकाराचा नाश होतो. समोर दिसणाऱ्या सर्व सजीव निर्जीव वस्तू ही एकाच परमात्म्याची रूपे आहेत हे ध्यानात घ्या.
क्रमश:








