कागलमध्ये दिव्यांगाना साहित्याचे वाटप
कागल / प्रतिनिधी
दिव्यांग बंधू आणि भगिनींनो, शारीरिक विकलांगतेमुळे खचून जाऊ नका. तुमचं जगणं सुकर व्हावे हाच माझ्या आयुष्याचा ध्यास आहे, असे भावनिक उद्गार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. आजपर्यंत माझ्यावर अनेक संकटे आली आणि तुमच्या या आशीर्वादांच्या पुण्याईमुळेच निघून गेलीही, असेही ते म्हणाले.
कागलमध्ये जयपूरच्या भगवान महावीर विकलांग सहायता समिती आणि नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने आयोजित दिव्यांगाना जयपूर पाय आणि हात अशा साहित्याच्या वाटप कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ बोलत होते. कार्यक्रमात जयपुर फूट बसविलेल्या दिव्यांगांनी स्वत:हून चालत येत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार केला. या सत्काराने मंत्री मुश्रीफ भावनिक झाले.
मंत्री मुश्रीफ भाषणात म्हणाले, रुग्णांची सेवा हा माझा स्थायीभाव आहे. त्यामुळेच ती सेवा मी ईश्वरसेवा म्हणून पार पाडतो. सुदृढ माणसाच्या एखाद्या अवयवाला वेदना असल्या किंवा किरकोळ जरी दुखापत असली तरी माणूस दिवस- रात्र बेचैन होऊन जातो. परंतु; दिव्यांग बांधव मात्र ह्या वेदना संपूर्ण आयुष्यभर सोसत असतात. त्यांचे दु:ख, वेदना, यातना कमी करून जीवन सुकर करण्याचा आमचा ध्यास आहे.
जयपूरच्या भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे डॉ. नारायण व्यास म्हणाले, आजवर संपूर्ण महाराष्ट्रात मी अनेक नेते पाहिले. परंतु; गोरगरिबांची आणि विशेषता रुग्णांची काळजी घेणारा मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासारखा नेता मला भेटलाच नाही. स्वत:च्या कुटुंबीयांप्रमाणे गोरगरिबांची आणि रुग्णांची काळजी ते घेतात. त्यांच्या या सेवाकार्यामुळे आपण भारावून गेलो, असेही ते म्हणाले.
केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने म्हणाले, शारीरिक विकलांगतेमुळे खचू नका, नाराज होऊ नका, घाबरू नका. नामदार हसनसाहेब मुश्रीफ हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
जयपुर पाय आणि हात बनविण्याचा कारखानाच आणला……!
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने कागलसह मुरगूड, गडहिंग्लज, उत्तुर येथे विभागीय दिव्यांग मेळावे झाले. या मेळाव्यांमधून एक हजारावर रुग्णांनी जयपुर पाय व हातासाठी नोंदणी केली होती. एवढ्या मोठ्या संख्येने नोंदणी केल्यामुळे मंत्री मुश्रीफ यांनी जयपुर पाय आणि हात बनविण्याचा कारखानाच कागलमध्ये आणला आणि तो छत्रपती शाहू हॉलमध्ये सुरू केला. आवश्यक हात व पायाची मोजमापे घेतल्यानंतर लगेचच दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्याची व्यवस्था केली. यामुळे उपस्थित रूग्णही भारावले.
यावेळी रक्ताच्या एक थेंबात 60 आवश्यक रक्त चाचण्या करणारे ब्लड एटीएम मशीनचे सादरीकरण सौ. रिचा शर्मा यांनी केले.
यावेळी कागलचे नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, नेताजीराव मोरे, नवल बोते, प्रवीण काळबर, संजय चितरी, विवेक लोटे, प्रमोद पाटील, पंकज खलीफ, इरफान मुजावर, लियाकत मकानदार, नवाज मुश्रीफ आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील – कुरुकलीकर यांनी केले. प्रास्ताविक रमाकांत धस यांनी केले सूत्रसंचालन बॉबी बालेखान यांनी केले.