प्रतिनिधी/ सातारा
लोणंद- फलटण रोडवर आदर्की जवळच कापशी बिबीला जाताना जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील माय लेकरांचा दुचाकीवरून जाताना समोरून येणाऱया ओमनी कारला धडकून झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये लता नारायण चव्हाण (वय 60) व निखिल नारायण चव्हाण (वय 30) असे मृत झालेल्या माय-लेकरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवार दि. 5 रोजी सायंकाळी आठच्या सुमारास लोणंद फलटण रोडवर आदर्की जवळच वडाचे म्हसवे येथून दुचाकी स्कुटीवरून कापशी बिबीला लता नारायण चव्हाण यांच्या माहेरी त्यांच्या आईला आजारी असल्याने भेटीस जात असतानाच समोरून येणाऱया ओमनी कारची आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यातच निखिल चव्हाण, लता नारायण चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात मृत झालेल्या दुर्दैवी माय-लेकरांचा झालेला असा मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. निखिल चव्हाण हा युवक म्हसवे येथे प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखला जात होता. या अपघाताची नोंद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.








