काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांचे प्रतिपादन
खानापूर : खानापूर तालुक्यात विकासाची गंगा आणून गेल्या पाच वर्षांत तालुक्याचा कायापालट करण्याचा सातत्याने प्रामाणिक प्रयत्न केला. मला काँग्रेसने पुन्हा उमेदवारी दिल्याने मी खानापूरचा विकास हेच माझे ध्येय ठेवलेले आहे. त्यामुळे खानापूरला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेवून ठेवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे, असे उद्गार बलोगा येथे सभेत बोलताना आमदार अंजली निंबाळकर यांनी व्यक्त केले. यावेळी तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोळीसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार अंजली निंबाळकर यांनी दो•होसूर, बलोगा, गांधीनगर, लक्केबैल या परिसरातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. मतदारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, देशात आणि राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून महागाई, बेरोजगारी यांनी कळस गाठलेला आहे. राज्यात भाजप सरकार आहे. खानापुरात भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांना तीन-तीनदा यावे लागत आहे. यावरूनच भाजपची पायाखालची वाळू घसरल्याचे स्पष्ट होत आहे. राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत मी काँग्रेसची आमदार असल्याकारणाने तालुक्याच्या विकासासाठी आडमुठे धोरण राबवून. विकासकामांचा निधी अडविला आहे. यासाठी काँग्रेसला मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसच्या महिला अध्यक्षा गीता अंबडकट्टी, भरतेश तोरोजी, अनिता दंडगल, काशीम हट्टीहोळी, देमाण्णा बसरीकट्टी यासह कार्यकर्ते उपस्थित हेते.









