अध्याय अठ्ठाविसावा
नामाचे महात्म्य सांगताना भगवंत उद्धवाला म्हणाले, उद्धवा जे सतत माझ्या नामाचा गजर करतील त्यांच्या महापातकांचा मी संहार करतो. माझ्या नामापाशी महापापाला बिलकुल थारा मिळत नाही. माझे नाम हे ब्रह्मास्त्रासारखे काम करते. त्याच्यापुढे महापाप मुंगीसारखे असल्याने नामापुढे उभारण्याची त्याच्या अंगी बिलकुल ताकद नसते. माझ्या नामाचाच जर एव्हढा प्रताप आहे तर माझी भक्ती किती शक्तिशाली असेल ह्याची कल्पनाच केलेली बरी. माझ्या भक्तीचा ठसा एकदा उमटला की, तो कलीकाळालाही नागवून सोडतो. मग देहाभिमानाची काय कथा? माझ्या नामाची शक्ती देहाभिमान समूळ नाहीसा करते. आणखीन सांगायचे म्हणजे माझ्या भजनाखेरीज अन्य कोणत्याही उपायाने देहाभिमान नाहीसा होत नाही. ज्यामुळे देहाभिमान नाहीसा होतो ते माझे भजन कसे करतात किंवा देहाभिमान नाहीसा होण्यासाठी माझे भजन कसे करावे असे विचारशील तर सांगतो ऐक, देहाभिमान नाहीसा व्हावा असे वाटत असेल तर अभेदभावाने माझी भक्ती करावी. जे जे भेटिजे भूत ते ते मानिजे भगवंत हे ज्यांना समजलंय आणि अंमलात आणायला जमतंय त्यांच्याच अहंकाराचा नाश होतो. समोर दिसणाऱ्या सर्व सजीव निर्जीव वस्तू ही एकाच परमात्म्याची रूपे आहेत हे ध्यानात घेऊन जो सर्वांवर सारखेच प्रेम करू शकेल त्यालाच अभेदभक्तीचे रहस्य समजू शकेल. नामाबद्दल पुढे सांगताना भगवंत म्हणाले, मझे नाम घेणे हे माझे भजनच आहे. जो माझे नाम घेत असतो, माझी कीर्ती ऐकत असतो आणि सदैव माझ्याबद्दल विचार करत असतो तो माझेच रुप होऊन वावरत असतो. त्यामुळे तो करत असलेल्या हालचाली मीच करत असतो, असे म्हणालास तरी चालेल. जो जागा असताना मनाने मला पहात असतो, त्याला मनी वसे ते स्वप्नी दिसे ह्या म्हणीनुसार स्वप्नात मीच दिसत असतो. त्याचे चित्त सतत माझेच चिंतन करत असल्याने त्याच्या चित्तात मीच भरून राहिलेला असतो. त्यामुळे स्वत:बद्दल विचार करायला त्याच्याकडे वेळच नसतो. ह्याप्रमाणे जो माझ्या भजनात दंग असतो. त्याचे त्रिगुण समसमान होऊन सर्व विकार मावळतात. त्यामुळे त्याचा अहंकार संपुष्टात येतो आणि विषयांबद्दल वाटणारी ओढ समूळ नष्ट होते. जेव्हा विषय माणसावर राज्य करतात तेव्हा ते त्याला हवं तसं नाचवतात. विषयोपभोग मिळावेत म्हणून मनुष्य वेड्यासारखा त्यांच्या मागे धावत सुटतो. त्यापायी काय वाट्टेल ते करायची त्यांची तयारी असते. त्यावेळी तो योग्य काय, अयोग्य काय ह्याची बिलकुल फिकीर करत नाही. अशा पद्धतीने विषयांचे गुलाम होऊन जो मनुष्य विषयोपभोग घेतो त्याला विषय नक्कीच बाधतात आणि त्याच्या पुनर्जन्माला कारणीभूत होतात. जे माझे निस्सीम भक्त असतात ते प्रारब्धानुसार वाट्याला आलेले भोग स्वत:वर पूर्ण ताबा ठेऊन भोगत असतात. त्यामुळे ते विषयांच्या कह्यात जात नाहीत. विषय भोगताना त्यांना आनंदही होत नाही किंवा भोग मिळाले नाहीत म्हणून दु:खही होत नाही. विषयांबद्दल संपूर्ण निरासक्त असल्याने त्यांना विषय बाधत नाहीत. ते विषयांबद्दल निरासक्त कसे होतात, त्यांना विषयांच्या उपभोगाची ओढ कशी वाटत नाही असे विचारशील तर त्याचे कारण असे की, ते क्षणोक्षणी माझेच भजन करत असल्याने वाट्याला आलेल्या विषयातून आनंद घेण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. म्हणून ते त्यांच्या वाट्याला आलेले विषय मलाच अर्पण करून टाकतात आणि नित्यमुक्त होतात. हे गुपित ज्यांच्या लक्षात येत नाही ते कुणीतरी सांगतंय म्हणून विषयांचा त्याग करण्यासाठी, त्यांच्याबद्दलची ओढ कमी होण्यासाठी नाना प्रयत्न करतात. हे करत असताना माझी प्राप्ती होण्यासाठी एक साधन म्हणून आपण विषयांचा त्याग करूयात हा विचार त्यामागे असतो. अर्थातच हे काही त्यांनी स्वेच्छेने केलेले नसल्याने त्याचा फारसा उपयोग होत नाही.
क्रमश:








