संस्कृत भाषा सर्वसामान्यांना समजायला अवघड असल्याने गीतेतील तत्वे सर्वांना अवगत व्हावीत ह्या एकमेव उद्देशाने माउलींनी ज्ञानेश्वरीत गीतेचे मराठी भाषेमध्ये विवरण केले आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माउलींनी गीतेवर टीका करताना भगवंतांनी अर्जुनाला केलेल्या उपदेशाच्या गाभ्याला कुठेही धक्का न लावता सविस्तर विवरण करून जागोजागी स्वत:चे मतही नोंदवले आहे. त्यामुळे हे नुसते भाषांतर नसून अभ्यासपूर्ण विवेचन झालेले आहे. आपल्या लेखमालेमध्ये, विनोबांनी केलेले गीतेच्या संस्कृत श्लोकांचे मराठी भाषांतर असेल. ते त्यांच्या गीताई ह्या पुस्तकातून घेतलेले आहे.
प्रसिद्ध कवी पी. सावळाराम ह्यांनी माउली मराठीतून श्रीमद्भगवद्गीता सांगत आहेत हे पाहून मराठी भाषेला अतिशय आनंद झाला आहे अशी कल्पना करून एक गीत तयार केले. हे गीत अतिशय प्रसिद्ध असून ते ह्याप्रमाणे आहे. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता लक्ष द्या हो विनवीते, मराठी मी त्याची माता । गोड माझ्या सोनुल्याचा लळा लागे बालपणा बांधुनिया घुंगुरवाळे अंगी नाचे थोरपणा। निरुपण सांगायाला, तुम्ही द्या हो शहाणपणा बाळमुखी मोठा घास भरवा हो जगन्नाथा । निरक्षर लोकांसाठी प्राणांचेही देऊन मोल अमृताते जिंकून पैजा धावे मराठीचा बोल । ज्ञानदीप डोळियाचे तेजाळता तेजोगोल देवगुरु खाली आले जोडोनिया दोन्ही हाता।
तेव्हा अमृताशी पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेत माउलींनी ओळख करून दिलेल्या गीताशास्त्राच्या अभ्यासाला आपण आता सुरवात करूयात.
ज्ञानेश्वरीच्या सुरवातीला माउली श्रीगणेशाला वंदन करत आहेत. श्रीगणेशाच्या सर्वांग सुदर मूर्तीचे ध्यान करून मूर्तीच्या एक एक अवयवाचे वर्णन करून सांगणे हे त्यांच्या गणेश वंदनेचे वैशिष्ट्या आहे. त्यांनी ज्या गणेशरूपाची अनुभूती घेतली त्याचे पहिल्या वीस ओव्यात वर्णन करून ते रूप आपल्या डोळ्यासमोर उभे करतात. ते म्हणतात, अगा जी ओंकारा, तुला नमस्कार ! तूच तर या जगताचा मूळ पुरुष ! वेद तुझेच यश गात आहेत. तुझे स्वरूप जाणायला केवळ तूच समर्थ आहेस. हे आत्मरूपा तुझा वारंवार जयजयकार असो. देवा निर्गुण असलेला तूच गणेशरूप घेऊन सगुण झालेला आहेस. आम्हा सर्वांच्या बुद्धिमध्ये तेवत असलेली ज्ञानज्योती तूच आहेस. मी निवृत्ती नाथांचा दास काय बोलतोय त्याकडे तुझे लक्ष असुदे. संपूर्ण वेदराशींनी युक्त असा देखणा वेष बाप्पा तुम्ही घेतलाय आणि वेदसमूहातील निर्दोष अशा अक्षरसमूहाने तुमचं शरीर तयार झालंय. वेद ही ईश्वराची निर्मिती असल्याने वेदातील अक्षरं ही निर्दोष आहेत. साहजिकच श्रीगणेशाची कायाही निर्दोष आहे.
आपलं सगळं वैदिक वाङ्मय हे अलिखित स्वरूपात असल्याने ते स्मृतीत म्हणजे आठवणीत ठेवलं जायचं. त्याचा उल्लेख करून माऊली म्हणतायत, स्मृतीतील वाङ्मय हेच श्रीगणेशाचे अवयव आहेत आणि ह्या स्मृतीतील वाङ्मय हे अर्थसौंदर्याने परिपूर्ण आहे म्हणून श्रीगणेशाचे अवयव हे लावण्याची खाण भासत आहेत. आपली अठरा पुराणे ही श्रीगणेशाचे रत्नजडित अलंकार आहेत. त्या अलंकारांना जडवलेली रत्ने म्हणजे पुराणातील उत्तमोत्तम तत्वे आहेत. रत्न कोंदणात ठेवलं की, खुलून दिसतं. पुराणातील छंदमय काव्यपंक्ती ही त्या रत्नांची कोंदणे आहेत. तत्वयुक्त असलेली आपली सर्व पुराणे ही कवितेतून सांगितली आहेत. ती काव्ये निरनिराळ्या छंदात रचलेली आहेत. तत्व जेव्हा कवितेतून सांगितली जातात तेव्हा ती लक्षात ठेवायला सोपी जातात. म्हणून तत्वांना काव्याचे कोंदण असेल तर ती जास्त प्रमाणात अंगिकारली जातात.
क्रमश:








