शिवराज काटकर / सांगली
वर्षानुवर्षे त्याच टेबलवर काम करणाऱ्या महसूल सहाय्यक, अव्वल कारकून, मंडल अधिकारी यांच्या बदल्या करून कधीही संधी न मिळालेल्यांना नेमून ट्रेनिंगला गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना परतल्यावर धक्का बसला आहे. ठाणेदार मंडळींच्या बदल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी परस्पर रद्द केल्याचे लक्षात येताच त्यांनी शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा देणारे परिपत्रकच जारी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या पवित्रामुळे महसूल प्रशासनात खळबळ उडाली आहे. अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, विभाग व इतर कार्यालय प्रमुख, प्रांत, तहसीलदार ते अप्पर तहसीलदारांपर्यंत सर्वांनाच आपल्या कृतीचा खुलासा देऊन ठाणेदारांना तात्काळ पदावरून हटवावे लागणार आहे.
सांगली जिल्हा प्रशासनात 20 टक्के तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी कायम मलईदार विभागात ठाण मांडून आहेत. काहीजणांची निम्मी नोकरी त्याच त्या विभागात झाली आहे. परिणामी हा जिल्हा आपण चालवतो असा या वीस टक्के मंडळींचा अविर्भाव आहे. जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी दोन महिन्यांपूर्वी जिल्हा ढवळून निघेल अशा बदल्या केल्या होत्या. बदली आदेश काढल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना एक महिन्याच्या ट्रेनिंगसाठी जावे लागले. परिणामी आपापल्या वरिष्ठांना लाडीगोडी लावून ठाणेदार मंडळी आहे तिथेच काम करू लागली. दूरच्या ठिकाणी बदली असली तरी आपल्या कार्यालयास हाच व्यक्ती पाहिजे, कौटुंबिक अडचण आहे असे कारण देत जिल्ह्यातील सर्वच कनिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या हाताखालचे लोक बदलीच्या ठिकाणी हजर दाखवून त्यांचा पगार तिथून काढायचा मात्र काम जुन्याच टेबलचे करायचे असे परस्पर ठरवले. बहुतांश अधिकाऱ्यांना आपल्या हाताखाली तीच मंडळी हवी असल्याने प्रत्येकाने बदल्या अप्रत्यक्ष रद्द करण्यास प्राधान्य दिले. मात्र यामुळे अन्याय झाल्याची भावना असलेल्या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी परतताच 28 जून रोजी त्यांच्याकडे याबाबत तक्रार केली. काही कर्मचारी आपण सर्व “बंदोबस्त” पार पाडतो असे सांगून तर काहींनी आपल्या संघटनेचा दबाव वापरून बदल्या रद्द केल्याचे वर्षानुवर्षे अन्याय होत असलेल्यांनी निदर्तशनास आणून देत तक्रार केली.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बदल्यांचा आढावा घेऊन अखेर 13 जुलै रोजी एक परिपत्रक जारी केले. त्यासाठी दोन जुन्या परिपत्रकाचा हवाला देऊन आपणास बदलीचे पूर्ण अधिकार आहेत. आपण केलेल्या बदल्या रद्द करण्याचा अधिकार कनिष्ठ अधिकाऱ्यांना नाही. त्यांना लोक कमी पडत असतील तर तसा अहवाल देऊन त्यांनी कर्मचारी मागावेत. मात्र, परस्पर बदल्या रद्द करणे आणि त्याबाबत आपणास कल्पनाही न देणे हा शिस्तभंग आहे, याची जाणीव जिल्हाधिकाऱ्यांनी या परिपत्रकाद्वारे करून दिली आहे. आदेश मिळाल्यानंतर संबंधितांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी पाठवून द्यावे अन्यथा तुमच्यावरच शिस्तभंग कारवाई केली जाईल अशी नोटीस जिल्हाधिकारी यांनी बजावल्याने महसूल प्रशासनात खळबळ माजली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या या कृतीनंतर कितीजणांना न्याय मिळतो, कितीजण राजकीय दबाव आणतात आणि किती जण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला नमवतात याकडे अन्याय झालेल्या कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या साहाय्यकाचाही शिस्तभंग
खुद्द जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय साहाय्यक पाटील यांनीच शिस्तभंग केल्याचे निदर्शनास आले आहे. पाटील यांची पूर्वीच कवठेमंकाळमध्ये बदली झाली होती. तरीही ते जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ठाण मांडून होते. यावेळी त्यांची करमणूक शाखेत बदली झाली. मात्र त्यांनी खुर्ची सोडली नाही. आपल्याच कार्यालयातील हा शिस्तभंग राजा दयानिधी कसा हाताळतात याकडे अन्यायग्रस्त महसूल कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.