वृत्तसंस्था / मुंबई
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी बाजारातील नियामक सेबीने एक आनंदाची बातमी दिली आहे, ती म्हणजे या गुंतवणूकदारांना लाभांश व युनिट विक्रीनंतरची रक्कम लवकर मिळणार आहे.
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना आता गुंतवणूक करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. शेअर बाजारातील नियामक सेबीने एक दिलासा देताना म्युच्युअल फंड युनिट धारकांना लाभांशाची रक्कम आणि युनिट विक्रीनंतरची रक्कम लवकरात लवकर हस्तांतरण केली जाणार असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात रक्कम मिळण्यासंदर्भातला जो कालावधी होता तो आता कमी करण्यात आला असल्याचे सेबीने म्हटले आहे.
किती दिवसात मिळणार रक्कम
मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (असेट मॅनेजमेंट कंपनी) यांना म्युच्युअल फंडधारकांना यापुढे लाभांश 7 दिवसाच्या आत द्यावा लागणार आहे. या आधी या लाभांश हस्तांतरणासाठी 15 दिवस लागत होते. याचप्रमाणे युनिट विक्रीनंतर खात्यात जमा होणाऱया रक्कमेसंदर्भातही कालावधी घटवून कमी करण्यात आला आहे. त्यांना ही रक्कम मिळण्यासाठी आता तीन दिवसांमध्ये मिळणार आहे. याआधी ही रक्कम जमा होण्यासाठी 10 दिवस लागत होते.
तर द्यावे लागणार व्याज
तर दुसरीकडे युनिट धारकांना काही कारणास्तव प्राप्त होणारी रक्कम मिळण्यास उशीर झाल्यास वर्षाच्या आधारावर 15 टक्के इतके व्याज कंपन्यांना द्यावे लागणार आहे.









