दिवसभरात हजारो भाविकांनी घेतला देवीच्या दर्शनाचा लाभ : यात्रेसाठी रस्त्यावर वाहनांच्या रांगा : मारिहाळ पोलिसांकडून बंदोबस्त
वार्ताहर /सांबरा
मुतगे येथील ग्रामदेवता व परिसरातील जागृत देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री भावकेश्वरी देवीच्या यात्रेला शुक्रवारी उत्साहात प्रारंभ झाला असून दिवसभरात हजारो भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. सालाबादप्रमाणे होणाऱ्या यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावर गर्दी होऊ नये म्हणून मारीहाळ पोलिसांनी योग्य खबरदारी घेतली होती. दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी मेन रोडनजीक पार्किंगची सोय करण्यात आली होती. यात्रेनिमित्त गावामध्ये विविध स्टॉल्स, खेळण्याची दुकाने, पाळणे व इतर मनोरंजनाचे स्टॉल्स गावात दाखल झाल्याने यात्रेला मोठे स्वरूप प्राप्त झाले होते. खेळणी व इतर साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी झाली होती. तरुणाईनेही यात्रेत गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. गावच्या वेशीजवळ सायंकाळी उशिरापर्यंत बकरी व कोंबडे खरेदी करण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होती.
प्रारंभी पहाटे मंदिरात विधिवत पूजा झाल्यानंतर हक्कदार घराण्यांकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर दिवसभरात ओटी भरणे व नवस फेडणे आदी कार्यक्रम सुरू होते. मंदिरात महिलांना व पुरुषांना दर्शनासाठी देवस्थान कमिटीकडून वेगवेगळ्या रांगा करण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाविकांना व्यवस्थितरित्या देवीचे दर्शन घेता आले. सायंकाळनंतर मुतग्याकडे येणाऱ्या वाहनांमध्ये वाढ झाल्याने सांबरा रोडवर वर्दळ वाढली होती. तसेच बसेस व खासगी टेम्पोही भाविकांनी भरून येत होत्या. सायंकाळच्या दरम्यान पावसानेही हजेरी लावली. मात्र पावसामध्येही भाविकांचे येणे सुरूच होते. दरम्यान, दिवसभरात यात्रेला सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, निलजी, बसरीकट्टी, कणबर्गी, काकती, कंग्राळी, कडोलीसह बेळगाव शहर व तालुका, खानापूर, कोल्हापूर व इतर ठिकाणच्या भाविकांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. सायंकाळी काहीकाळ वीजपुरवठा खंडित झाल्याने भाविकांची गैरसोय झाली. रात्री बारानंतर गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम झाला.
यात्रेची आज सांगता
शनिवार दि. 15 रोजी घरोघरी जेवणाचा बेत असल्याने दिवसभर भाविकांची गर्दी राहणार आहे. तर रात्री यात्रेची सांगता होणार आहे. सालाबादप्रमाणे होणाऱ्या या यात्रेला दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते.









