नरेगा कामगारांची मागणी : जिल्हा पंचायत अधिकाऱ्यांना दिले निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्ह्यातील प्रत्येक ग्राम पंचायतीने नरेगा योजनेंतर्गत किमान 100 दिवस काम दिलेच पाहिजे. जर ग्राम पंचायतीने काम दिले नाही तर त्यांची संपूर्ण चौकशी करून ग्राम पंचायतीवर कारवाई करावी, 2 फेब्रुवारी हा नरेगा कामगार दिन म्हणून साजरा करावा, यासह इतर मागण्यांसाठी बेळगाव, खानापूर, हुक्केरी आणि गोकाक तालुक्यातील नरेगा कामगारांनी जिल्हा पंचायत कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.
जिल्ह्यातील अनेक ग्राम पंचायती नरेगा योजनेंतर्गत काम देण्यास तयार नाहीत. त्यामुळे कामगारांवर अन्याय होत आहे. जर काम नसेल तर बेरोजगार भत्ता द्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून कामगारांची हजेरी घेतली जात आहे. मात्र अनेक ठिकाणी सर्व्हरची समस्या निर्माण होत आहे. तेव्हा ऑफलाईन हजेरी घ्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
काम केल्यानंतर त्याचे मोजमाप करताना योग्य प्रकारे केले जात नाही. काम कमी केले आहे म्हणून अनेकांना मजुरी कमी दिली जात आहे. त्यामुळे त्या कामगारांवर अन्याय होत आहे. तेव्हा योग्य मोजमाप घेऊन संबंधित कामगारांना योग्य मजुरी द्यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. नियोजन संचालक तसेच तालुका पंचायतच्या अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आले.
येळळूर व धामणे ग्राम पंचायतमधून कामगारांना काम दिले जात नाही. सध्या काही मोजके दिवसच काम दिले गेले आहे. तेव्हा 100 दिवस काम द्यावे, अशी मागणीदेखील करण्यात आली. यावेळी शारदा दाबडे, शिवाजी कागणीकर, अॅड. एन. आर. लातूर, राहुल पाटील, अडव्याप्पा कणबर्गी, कविता मुरकुटे, बसवंत कोले यांच्यासह कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.









