वृत्तसंस्था / .गाझियाबाद
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे एका मुस्लीम दाम्पत्याने हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. या दाम्पत्यातील पतीने आपले शहजाद हे नाव त्यागून शिवकुमार भारद्वाज हे नाव धारण केले आहे, तर पत्नीने साक्षी भारद्वाज हे नाव धारण केले आहे. आम्ही गेल्या आठ वर्षांपासून हिंदू जीवनपद्धीचा स्वीकार पेलेला आहे. हिंदू धर्माचे सर्व सण आणि रीतींचे आम्ही पालन करतो. त्यामुळे आम्ही आता उघडपणे हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे, असे या दाम्पत्याचे म्हणणे आहे.
हिंदू रक्षा दल या संघटनेच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. या संघटनेचे अध्यक्ष पिंकी चौधरी यांच्या नेतृत्वात ही ‘घरवापसी’ झाली. आमचे एक कुटुंब आणि एक घर आम्ही परत मिळविले आहे. या दाम्पत्याने स्वेच्छेने हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे. त्याने तशी इच्छा आमच्याकडे व्यक्त केली होती. त्यामुळे आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा परिवार अनेक वर्षांपासून हिंदू चालीरितींचे अनुसरण करीत आहे. आता हे दाम्पत्य प्रत्यक्षरुपाने हिंदू धर्मात आले आहे. आम्ही त्यांचा सन्मान ठेवू आणि त्यांच्या निर्णयामुळे त्यांना समाधान वाटेल अशी स्थिती निर्माण करु, असे प्रतिपादन चौधरी यांनी केले.
आणखी अनेक परिवार संपर्कात
मुस्लीम समाजातील आणखी अनेक परिवार आमच्या संघटनेच्या संपर्कात आहेत. आम्ही त्यांनाही सनातन धर्मात परत आणण्यासाठी सज्ज आहोत. आम्ही हे पुण्यकर्म करीत आहोत. आम्ही हे कार्य पुढेही करत राहू, असे प्रतिपादन चौधरी यांनी केले. या मुस्लीम दाम्पत्याला हिंदू सण आणि चालीरिती यांच्यासंबंधी आदराची भावना होती. त्यांनी या चालीरिती आत्मसातही केल्या आहेत. आता हे दाम्पत्य हिंदू झाले आहे. याच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व आम्ही स्वीकारले आहे. आमची संघटना त्यांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. अधिकाधिक लोकांनी अशा प्रकारे आपल्या मूळ धर्मात परत यावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील असून आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे पिंकी चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.









