वक्फ संस्थांना फारसे अधिकार नाहीत, भारतात मात्र गदारोळ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्र सरकारने वक्फ कायद्यात बऱ्याच सुधारणा सुचविणारे विधेयक लोकसभेत मांडले आहे. सध्या ते संयुक्त संसदीय समितीकडे अधिक विचारमंथनासाठी सोपविण्यात आले असून त्यानंतर ते संसदेत संमत करण्यासाठी परत पाठविण्यात येईल. तथापि, या विधेयकावरून बराच राजकीय गदारोळ माजला आहे. विरोधी पक्षांनी या सुधारणांविरोधात रान उठविले असून त्यांना विरोध केला आहे.
तथापि, जेथे शरियत लागू आहे, आणि जी कट्टर इस्लामिक राष्ट्रे म्हणून ओळखली जातात, तेथे वक्फचे कायदे भारतापेक्षाही कठोर आहेत. वक्फ संस्थांना तेथे फारसे अधिकार नाहीत. त्याचप्रमाणे या संस्थांच्या व्यवहारांवर तेथे बारकाईने लक्ष ठेवले जाते, ही बाब या निमित्ताने समोर आली आहे. भारतात मात्र वक्फ मंडळाला बरेच अधिकार देण्यात आले असून ते अन्य कोणत्याही अन्य धर्मांच्या संस्थांपेक्षा अधिक आहेत. असे अधिकार अन्य कोणत्याही देशांमध्ये नाहीत.
तुर्कस्थानमध्ये कठोर नियम
तुर्कस्थानमध्ये ओटोमान साम्राज्याच्या काळापासून वक्फच्या संस्थांचा बोलबाला होता. या संस्थांनी समाज कल्याण, शिक्षण आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये मोठी कामगिरीही केली होती. तथापि, 1923 मध्ये त्या देशात क्रांती झाल्यानंतर वक्फ मंत्रालय बरखास्त करण्यात आले आणि सर्व वक्फ मालमत्तेचा ताबा तेथील केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या जनरल डायरेक्टरेट ऑफ फाऊंडेशन्सने घेतला. अशा प्रकारे वक्फ संस्थांचे केंद्रीकरण करून त्यांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले. आजही या देशात वक्फ मालमत्ता तेथील केंद्र सरकारच्याच हाती आहेत.
कुवेतमध्येही केंद्रीकरण
कुवेत या मुस्लीम देशामध्येही वक्फ मालमत्तेचे व्यवहार आणि व्यवस्थापन तेथील केंद्र सरकारच्या आधीन आहे. वक्फ आणि वक्फ मालमत्तांमधून मिळणाऱ्या महसुलाचे वितरण करण्याचे सर्व अधिकार तेथे वक्फ संस्थेला नव्हे, तर केंद्र सरकारला आहेत. वक्फ मालमत्तांचे डिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया केली जात आहे. या देशातही वक्फ संस्थेला कोणतेही अधिकार नाहीत.
सिरीयात सरकारचेच नियंत्रण
या मुस्लीम देशात वक्फचे नियंत्रण पूर्णपणे तेथील केंद्र सरकारकडे आहे. सरकारकडूनही वक्फ मालमत्तांमधून मिळणाऱ्या महसुलाचे वितरण आणि व्यवस्थापन केले जाते. यासाठी तेथे सरकारमध्ये स्वतंत्र विभाग आहे. तेथे वक्फ मंडळांना कोणतेही स्वतंत्र अधिकार देण्यात आलेले नाहीत, अशी परिस्थिती आहे.
इराकमध्ये विभाजन
इराकमध्येही वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन केंद्र सरकारकडून केले जाते. तेथे सुन्नी आणि शिया यांची स्वतंत्र वक्फ मंडळे आहेत. भारतात मात्र, एकाच वक्फ मंडळाकडून व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे भारतात शिया आणि इस्लामच्या इतर पंथांनी स्वतंत्र वक्फ मंडळांची मागणी पेलेली आहे. नव्या प्रस्तावित वक्फ कायद्यात या मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याचे दिसून येते.
इस्लामच्या जन्मभूमीत…
सौदी अरेबिया ही इस्लामची जन्मभूमी मानली जाते. तेथेही वक्फ ही संकल्पना काळाच्या ओघात अधिक उक्रांत झालेली आहे. येथे वक्फ संस्थेवर तेथील सत्ताधीश कुटुंबाचे नियंत्रण आहे. सत्ताधीश कुटुंबाने 2016 मध्ये नवा कायदा करण्यात आला आहे. त्यानुसार वक्फ व्यवस्थापन मंडळ तेथील राष्ट्रप्रमुखांच्या आधीन करण्यात आले आहे. सौदी अरेबियातही वक्फ संबंधीचे नियम अत्यंत कठोर असून वक्फ संस्थेला सरकारच्या आधीन राहूनच नियमांतर्गत काम करावे लागते.









