वसगडे / वार्ताहर
बकरी ईद आणि आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने ईद दिवशी कुरबानी न करण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य असून कोणत्याही सण – उत्सव काळात गावाने संयम दाखवल्याचे पाहीले आहे. त्यामुळे वसगडे हे शांतता प्रिय गाव असल्याचे प्रतिपादन भिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी केले. आषाढी एकादशी आणि बकरीद एकाच दिवशी येत असल्याने पलूस तालुक्यातील वसगडे येथील मुस्लिम बांधवांनी त्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय बैठक घेऊन जाहीर केला त्या प्रसंगी ते बोलत होते.
वसगडेत सर्व समाज एकमेकांची मन जपण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. जाती-धर्मांच्या भिंती असं इथं काही घडलं नाही. एकमेकाची काळजी करण्याची परंपरा वर्षांनुवर्षाची आहे. मुस्लिम समाजाने जो उपक्रम राबवला तो कौतुकास्पद आहे असे मत पोलीस पाटील शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले. समाजात वाईट गोष्टी गतीने पसरतात पण चांगली गोष्ट पसरवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी अब्दुल पटेल,मानेखान जमादार, उमर मुल्ला, अबीद जमादार, शब्बीर लांडगे, आलमगीर बारगीर, गणी शिकलगार,राजू नदाफ, यासीन लांडगे, इकबाल पठाण, असलम चौगुले, खुदबुद्दीन लांडगे, लियाकत लांडगे आदी तसेच समाज बांधव उपस्थित होते.
तसेच मणेराजूरी येथे अनेक वर्षांनी आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने मणेराजूरी गावातील मुस्लिम बांधव आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी करणार नाहीत, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मणेराजूरी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मन्सूर आत्तार यांनी याबाबत माहिती दिली. या बैठकीला मन्सूर अत्तार गणी पठाण ;मुसा नदाफ अकबर पठाण;बादशाह शेख ( कोतवाल ) शेरुद्दीन मुजावर ;आदी प्रमुख मुस्लीम बांधव व गावातील प्रमुख सर्वपक्षीय पदाधिकारी उपास्थित होते . गावातील मुस्लिम समाज जामे मसजीद यांनी आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी न करण्याचा निर्णय घेण्यात आला; या निर्णयाचे निवेदन तासगांव पोलीस स्टेशनचे निरीक्षक भानुदास निभोंरे यांना देणेत आले .








