2.82 लाख कोटी रुपयांना व्यवहार : दोन्ही कंपन्या मस्क यांच्याच मालकीच्या
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
एलोन मस्क यांनी आपली सोशल मीडिया कंपनी ‘एक्स’ स्वत:च्याच आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) कंपनी ‘एक्सएआय’ला 33 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 2.82 लाख कोटी रुपयांना विकली आहे. हा व्यवहार रोख रकमेऐवजी शेअर्सच्या स्वरुपात झाला आहे. म्हणजेच दोन्ही कंपन्यांमध्ये रोख रकमेऐवजी शेअर्सची देवाण-घेवाण झाली आहे. एलोन मस्क यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये या करारासंबंधीची माहिती दिली. ‘एक्स’ आणि ‘एक्सएआय’ या दोन्ही कंपन्या एलोन मस्क यांच्या मालकीच्याच आहेत.
एलोन मस्क यांनी 2022 मध्ये ‘एक्स’ला अंदाजे 44 अब्ज डॉलर्समध्ये म्हणजेच 3.80 लाख कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. तथापि, ‘एक्स’च्या काही गुंतवणूकदारांनी अलीकडेच कंपनीचे मूल्य सुमारे 12 अब्ज डॉलर्स (1.02 लाख कोटी रुपये) असल्याचे म्हटले होते. तथापि, डिसेंबरच्या निधी संकलन फेरीत ‘एक्सएआय’चे शेवटचे मूल्यांकन सुमारे 40 अब्ज डॉलर्स (सुमारे 3.42 लाख कोटी रुपये) केले होते.









