देशातील संपूर्ण मार्केटिंग-कम्युनिकेशन टीम बरखास्त
नवी दिल्ली / प्रतिनिधी
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांनी कंपनी विकत घेतल्यानंतर ट्विटर अनेक देशांमध्ये कर्मचारी कपात करत आहे. ट्विटरने शुक्रवारी भारतात मोठय़ा प्रमाणावर कर्मचाऱयांना घरचा रस्ता दाखवल्याने ‘दहशत’ पसरली आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार ट्विटरने भारतातील आपली संपूर्ण मार्केटिंग आणि कम्युनिकेशन टीम बरखास्त केली आहे. कर्मचाऱयांना ई-मेलद्वारे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
जागतिक स्तरावर कर्मचाऱयांची संख्या कमी करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून ट्विटरने भारतातील कर्मचाऱयांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. एलॉन मस्क यांनी गेल्या आठवडय़ात ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पराग अग्रवाल, तसेच मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) आणि इतर काही उच्च अधिकाऱयांना काढून टाकले. मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर उच्च व्यवस्थापनातील अनेकांनी राजीनामे दिले किंवा घेतले आहेत. मस्क यांच्या या निर्णयामुळे अनेक कर्मचारी भीतीच्या छायेत वावरत आहेत.
मस्क यांनी आता कंपनीचे जागतिक कर्मचारी वर्ग कमी करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर टाळेबंदी सुरू केली आहे. ट्विटर इंडियाच्या एका कर्मचाऱयाने नाव न सांगण्याच्या अटीवर कर्मचारी कपातीबाबत माहिती दिली. मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेण्यापूर्वी सोशल मीडिया कंपनीतील कर्मचाऱयांची संख्या कमी करणार असल्याची चर्चा होती.









