इम्रान गवंडी,कोल्हापूर
Kolhapur News : पाऊस सुरू झाला की सर्वसामान्यांना परवडणारी, वापरायला सोपी अशी छत्रीची सोबत आलीच.. बाजारात आज आबालवृद्धांसाठी दाखल विविध व्हरायटीच्या छत्र्यांनी भुरळ घातली आहे. बाजारात छत्र्यांच्या शेकडो व्हारायटी दाखल झाल्या आहेत. अगदी 70 रूपयांपासून ते 1400 रूपयांपर्यंत त्यांच्या किंमती आहेत. जिल्ह्यात सुमारे 15 कोटींची उलाढाल छत्र्यांद्वारे होत आहेत. चार वर्षाच्या तुलनेत यंदा प्रथमच छत्र्यांच्या किंमतीत 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे.
एरव्ही अडगळीत पडलेल्या छत्रीला पावसाळ्यात मागणी वाढते. कडाक्याच्या उन्हातही छत्रीचा वापर केला जातो. एकेकाळी छत्री बाळगणे ही सामाजिक प्रतिष्ठा होती. अन् पावसाळ्यात ती आबालवृद्धांची गरज बनली आहे. छत्र्यांची निर्मिती राजस्थानमधील पालना शहरात मोठ्या प्रमाणात होते. मुंबईतही छत्री निर्मितीचे कारखाने आहेत. पॉलिस्टर, नॉयलॉन कापडापासुन त्याची निर्मिती होते. यामध्ये किड्स अॅंब्रेला, टू फोल्ड, थ्री फोल्ड, सप्तरंगी, लाँग अंब्रेला, गोल्फ अॅंब्रेला आदी शेकडो व्हरायटी आहेत. सध्या ब्लु-ट्रूथ कनेक्टिव्हिटा असलेल्या स्मार्ट छत्रीची क्रेझ वाढत आहे. या छत्र्यांची उंची 20 ते 34 इंच इतकी आहे. पुर्वी हरीण छाप छत्र्यांना मागणी होती.
शालेय विद्यार्थ्यांसाठी किड्स अंब्रेला, सप्तरंगी, नवरंगी छत्र्या उपलब्ध आहेत. हरीण, ससा, पतंग नावाने ओळखणाऱ्या छत्र्यांसह कार्टुन्स, बार्बीच्या छत्र्यांकडे &चिमुकली आकर्षित होत आहेत. पुरूष, महिलांसाठी डिझाईन्सच्या छत्र्याही उपलब्ध आहेत. यामध्ये अॅंब्रेला, लाँग, गोल्फ, थ्री-फोर, लेडीज पियानो फोल्डिंग छत्र्यांचे खास आकर्षण आहे.
ब्लु-ट्रुथ स्मार्ट छत्रीद्वारे संगीत ऐकण्याची सुविधा
या छत्रीला ब्लु-ट्रुथद्वारे मोबाईल कनेक्ट करण्याची सुविधा आहे. याद्वारे संगीत ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे. ही छत्री आपोआप उघडते व बंद होते. वजनाला हलकी व आकाराने लहान असल्याने वापरण्यासही ती सोपी आहे.
छत्र्यांचे दर (व्हरायटीनुसार) असे :
किड्स अंब्रेला : 70 ते 400 रूपये, टु फोल्ड अंब्रेला : 150 ते 550 रूपये, थ्री फोल्ड अॅंब्रेला : 350 ते 1300 रूपये, ब्लु-ट्रुथ स्मार्ट छत्री : 1000 ते 1300 रूपये, लाँग व गोल अॅब्रेंला : 150 ते 600 रूपये.
चित्रपटातील गाण्यात छत्रीने भरला रंग
अनेक हिंदी चित्रपटांतील गाण्यांत छत्रीने रंग भरला आहे. 1953 मधील श्री 420 मधील ‘प्यार हुआ इकरार हुआ..’ हे गाणे कानावर पडताच राजकपूर-नर्गिस आणि छत्रीचे समोर येते. ‘अमर, अकबर, अँथोनी’तील ‘माय नेम इज अँथोनी गोन्साल्विस..’ गाण्यात पाऊस नसला तरी छत्रीसह अमिताभने केलेले नृत्य आजही हिट आहे. ‘चालबाज’मधील गाण्यात छत्रीसह नृत्य करणारी श्रीदेवी, अमीर खानच्या ‘थ्री इडियट’मधील ‘जुबी..जुबी..,’ गोपी-किशनमधील ‘छत्री ना खोल बरसातमें..’ अशा गाण्यात छत्रीचा वापर केला आहे.
दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ
चार वर्षाच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच दरात 15 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. विविध आकार व आकर्षक डिझाईन्समधील छत्र्या खरेदीकडे नागरिकांचा कल आहे. कच्चा मालाची कमतरता, इंधन दरवाढीमुळे छत्र्यांच्या दरात वाढ झाली आहे.
आशिष जुर्खिया, छत्री विक्रेते









