प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावचे कै. पं. बी. व्ही. कडलास्करबुवा मेमोरिअल ट्रस्ट व कन्नड आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 5 नोव्हेंबर रोजी ट्रस्टचे उद्घाटन व संगीत मैफलचे आयोजन करण्यात आले आहे. सरस्वती वाचनालय येथे सायंकाळी 5 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन अॅड. डॉ. एस. बी. शेख यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड व सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री व अ. भा. गांधर्व महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष पी. एस. कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
यानंतर मुंबईचे कुणाल भिडे यांचे गायन, बेळगावचे संजय देशपांडे यांचे सतार वादन व पुण्याच्या वर्षा नेने यांचे गायन होणार आहे. कलाकारांना तबल्यावर नारायण गणाचारी, वैभव गाडगीळ व अंगद देसाई तर संवादिनीवर वामन वागुकर, मुकुंद गोरे साथ करणार आहेत. कार्यक्रम सर्वांना खुला आहे.
परिचय
कुणाल भिडे यांचे प्राथमिक संगीत शिक्षण रत्नागिरी येथील संगीता बापट यांच्याकडे झाले. सध्या डोंबिवली येथील महेश कुलकर्णी यांच्याकडे शिक्षण घेत आहेत. ते स्वाफ्टवेअर इंजिनिअर आहेत.
वर्षा नेने या बेळगावच्याच असून त्यांनी प्रारंभी पं. कडलास्कर बुवा यांच्याकडे शिक्षण घेतले. सध्या पुण्याच्या सुधा पटवर्धन यांच्याकडे संगीताचा अभ्यास करत आहेत. राज्य सरकारकडून सलग तीन वर्षे त्यांनी शास्त्राrय गायनासाठी शिष्यवृत्ती मिळविली. गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबईच्या कार्यकारिणी सदस्या आहेत.
संजय देशपांडे बेळगावचेच असून सतार वादक आहेत. सतार हे केवळ एक वाद्य नसून त्यावर चित्रपट, संगीत, जाझसंगीत, रॉक, स्पॅनिश असे संगीत वाजविता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. सतारीवर ख्याल वाजविणारे ते एकमेव सतारवादक आहेत. ते संगीत विशारद असून पं. व्ही. के. धर्माधिकारी यांचे शिष्य आहेत. गेली 30 वर्षे आकाशवाणी व 20 वर्षे दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कलाकार आहेत.









