नारायण नावती यांचे उद्गार
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
भारतीय संगीत कला ही प्राचीन असून रंजकता आणि रसप्रदानता हा या कलेचा स्थायीभाव आहे. श्रोत्यांना आनंद देण्याची क्षमता संगीतात असून ती निरंतर प्रक्रिया आहे असे प्रतिपादन कलाप्रेमी व निवृत्त निवडणूक अधिकारी नारायण नावती यांनी केले. रासई-लोटली येथील स्वरलक्ष्मी कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष गीतेश रासईकर, श्रीमती सलपा मयुरेश वस्त, दत्ताराम वस्त, स्वरलक्ष्मी कार्यक्रमाचे संयोजक गोकुळदास रासईकर हे उपस्थित होते.
श्री. नावती यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलीत करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. गीतेश रासईकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून नवीन रंगमंचाचे उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ पकवाजवादक श्रीकांत शिरोडकर हे यावेळी उपस्थित होते. पकवाज व तबलावादक विष्णू धनंजय नाईक यांना यंदाचा स्व. मयुरेश वस्त स्मृती पुरस्कार नारायण नावती यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. स्वरलक्ष्मीच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त या कार्यक्रमात गेली अनेक वर्षे योगदान देणारे विनोद मुकुंद नाईक, धनराज दुर्गादास मडकईकर, मुकुंद सावळो गावडे, दिगंबर नाईक, मययूर मोहन नाईक व सुमन चंद्रकांत वाडीकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.









