कोल्हापूर :
लोकसभा, विधानसभेनंतर आता महापालिका निवडणूकीची चर्चा रंगू लागली आहे. राज्यातील बदलेल्या समीकरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील राजकीय गणिते बदलली जाणार आहेत. सध्या कोल्हापुरातील महायुतीचे कार्यकर्ते स्वबळावर लढण्यासाठी अग्रही आहेत. असे असले तरी निकालानंतर भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे, आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे महायुती म्हणूनच एकत्र येणार आहेत. यामुळे कोल्हापूर महापालिकेत महायुतीच्या माध्यमातून ‘एमएमआर’ (मुश्रीफ, महाडिक, राजेश क्षीरसागर) अशी आघाडी प्रथमच अस्तित्वात येणार आहे. दुसरीकडे आमदार सतेज पाटील यांच्यांशी त्यांचा सामना होणार आहे. सतेज पाटील यांच्या सोबत राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट असणार आहे.
राज्यातील मागील अडीच वर्षापासून राजकीय समीकरण बदलली आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीत फुट पडली आहे. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप अशी महायुती झाली आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट अशी महाविकास आघाडी आहे. नुकत्याच विधानसभेची निवडणूकही महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशीच थेट लढत झाली. यामध्ये एकहाती महायुतीची राज्यात सत्ता आली. यानंतर महायुतीला राजकीय वातावरण पोषक बनले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराजच्या रखडलेल्या निवडणूकीमध्ये याचा फायदा घेण्यासाठी महायुतीची रणनिती असणार आहे. कोल्हापूर महापालिकेच्या राजकारणातही अमुलाग्र बदल होणार आहे.
हसन मुश्रीफ यांनी सहकार संस्थेच्या निवडणूका स्वतंत्र लढल्या जातील आणि मनपा, जि.प निवडणूका महायुती एकत्र लढवतील, असे स्पष्ट केले आहे. तसेच राजेश क्षीरसागर यांनी महायुती मनपा निवडणूकीत एक असणार असे म्हटले आहे. दुसरीकडे कार्यकर्ते मात्र, स्वबळाचा नारा देत आहे. इच्छुकांची संख्या जास्त असणार आहे. बंडखोरी होऊ नये त्यामुळे एखाद्यावेळेस महायुतीतील घटक पक्ष निवडणूक स्वबळावर लढतील. परंतू निकालानंतर तीन पक्ष एकत्र आघाडी करणार हे उघड आहे. सध्याचे राजकीय वातावरण पाहता महायुतीमधील घटक पक्ष महाविकास आघाडीतील पक्षासोबत निकालानंतर आघाडी करतील, अशी स्थिती नाही. त्यामुळे मनपाच्या आगामी निवडणूकीत प्रथमच महाडिक, मुश्रीफ आणि क्षीरसागर एकत्र असणार आहेत. त्यांच्या विरोधात आमदार सतेज पाटील यांची महाविकास आघाडी असणार आहे.
सध्या केंद्रात–राज्यात महायुती असल्याने इच्छुकांचा कल महायुतीमधील पक्षातूनच उमेदवारीसाठी असणार यात वाद नाही. सहाजिकच महायुतील तगडे उमेदवार मिळणार यात शंका नाही. या उलट जिल्ह्यातील तीन नेते एकत्र आणि त्यांच्या विरोधात आमदार सतेज पाटील व त्यांची महाविकास आघाडीचे नेत असणार आहेत. स्वबळावर जरी ही निवडणूक लढली गेली तर काही ठिकाणी उमेदवारी देतानाही सेटलमेंट होण्याची शक्यता आहे.
‘मनपा’नंतर आता ‘एमएमआर’
महापालिकेमध्ये 1990 मध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक, दिवंगत आमदार पी.एन.पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष अरूण नरके यांची ताराराणी आघाडी म्हणून सत्तेवर होती. त्यास ‘मनपा असेही म्हटले जात होते. याच धर्तीवर आगामी निवडणूकीत ‘एमएमआर’ म्हणजे आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक आणि राज्य नियोजन मंडळाच्यो कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर अशी आघाडी असेल.
दहा वर्षाने पाटील, मुश्रीफ आघाडीत फुट
गेल्या दहा वर्षामध्ये हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांची महापालिकेत सत्ता होती. मनपाच्या आगामी निवडणूकीमध्ये प्रथमच हे दोघे एकमेंकांविरोधात असणार आहेत. राजेश क्षीरसागर मनपात 2015-20 दरम्यान, महाविकास आघाडीसोबतच होते. आता तेही भाजपसोबत असणार आहेत. यामुळे नक्कीच महायुतीची ताकद वाढणार आहे.
महाविकास आघाडीतील नेत्यांची अशी असणार फौज
आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, काँग्रेसचे सचिन चव्हाण, शरद पवार राष्ट्रवादी गटाचे व्ही.बी. पाटील, आर.के. पोवार
महायुतीच्या नेत्यांची अशी असणार फौज
माजी मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेनेचे सत्यजित कदम, सुजित चव्हाण, राष्ट्रवादीचे आदिल फरास, भाजपचे महेश जाधव, विजय जाधव, राहूल चिकोडे








