वृत्तसंस्था/ मुंबई
2024 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या बडोदा संघाविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुशीर खानच्या नाबाद शतकाने मुंबईचा पहिला डाव सावरला. पहिल्या दिवसाअखेर मुंबईने 90 षटकात 5 बाद 248 धावा जमवल्या. मुशीर खान 128 तर तेमोरे 30 धावावर खेळत आहेत.
सदर सामना येथील बीकेसी मैदानावर खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेत अलीकडेच झालेल्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 18 वर्षीय मुशीर खानने सर्वाधिक धावा जमवल्या होत्या. मुशीर खान हा सध्या भारतीय संघातून इंग्लंडविरुद्ध खेळणाऱ्या सर्फराज खानचा लहान भाऊ आहे.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुशीर खानने आपल्या दमदार खेळीच्या जोरावर संघाचा डाव सावरला. मुंबईची एकवेळ स्थिती 4 बाद 99 अशी होती. मुशीर खानने 216 चेंडूत 10 चौकारासह नाबाद 128 धावा झळकवल्या. सलामीच्या पृथ्वी शॉने 46 चेंडूत 6 चौकारासह 33 धावा जमवल्या. शॉ आणि लालवाणी यांनी पहिल्या गड्यासाठी 57 धावांची भागीदारी केली. लालवाणीने 3 चौकारासह 19 धावा जमवल्या. कर्णधार अजिंक्य रहाणे केवळ 3 धावावर बाद झाला. अष्टपैलू मुलानी 6 धावावर तंबूत परतला. मुशीर खानने शेडगे समवेत पाचव्या गड्यासाठी 43 धावांची भागीदारी केली. शेडगेने 20 धावा केल्या. शेडगे बाद झाल्यानंतर यष्टीरक्षक आणि फलंदाज तमोरेने मुशीर खानला चांगली साथ दिली असून या जोडीने दिवसअखेर सहाव्या गड्यासाठी अभेद्य 106 धावांची भागीदारी केली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांचे निधन झाल्याने या सामन्याच्या सुरुवातीला खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुंबईच्या खेळाडूंनी दंडाला काळ्या फिती बांधून मैदानात प्रवेश केला. बडोदा संघातर्फे भार्गव भटने 82 धावात 4 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : मुंबई प. डाव 90 षटकात 5 बाद 248 (मुशीर खान खेळत आहे 128, हार्दिक तमोरे खेळत आहे 30, पृथ्वी शॉ 33, लालवानी 19, अजिंक्य रहाणे 3, शेडगे 20, भार्गव भट 4-82).









