शरीर तगडे आणि तंदुरुस्त दिसावे म्हणून अनेकजण अनेक उपाय करतात, हे खरे आहे. स्नायू सौष्ठव (मसल बिल्डिंग) हा अनेक तरुणांचा तर छंदच असतो. पण रशियातील एका किरील टेरेशिन नामक युवकाने स्नायू कमावण्यासाठी एक जगावेगळी शक्कल लढविली आहे. त्याने आपल्या डॉक्टरांना सांगून चक्क तेलाची इंजेक्शने घेतली. त्यामुळे त्याच्या दंडांचे आणि माडय़ांचे स्नायू टरारुन फुगले. याच अफलातून तरुणाने आता आपला चेहरा प्लॅस्टिक सर्जरी करुन परग्रहावरील मानवासारखा (एलियन) करुन घेतला असून तो चर्चेचा विषय झाला आहे.

तेलाची इंजेक्शने घेण्याची ही अनोखी युक्ती त्याच्याच डोक्यातून साकारली आहे. त्याच्या डॉक्टरांनी त्याला तसे न करण्याचा सल्ला दिलेला होता. एकतर अशा मार्गाने स्नायू सौष्ठवाचा उद्देश साध्य होणार नाही, असे त्यांचे मत होते. आणि दुसरे, असा मार्ग शरीरासाठी धोकादायक असल्याचे त्यांनी ठासून सांगितले होते. पण कमीत कमी वेळात स्नायू कमावण्याची इतकी हौस या तरुणाला होती की त्याने हा धोका पत्करायचे ठरविले. त्याचा उद्देश साध्यही झाला. तथापि, त्याने जे केले त्याचे अनुकरण कोणीही करु नये, असा महत्वाचा इशारा अनेक तज्ञांनी दिला आहे. एखाद्याला ते काही काळापुरते जमले याचा अर्थ तो शरीर प्रकृती सुदृढ ठेवण्याचा राजमार्ग बनला असा होत नाही. अशा शॉर्टकट मार्गाने आपल्या शरीराची दीर्घकालीन हानी होण्याचा संभवच अधिक असतो. शिवाय अशा मार्गाने कमावलेले स्नायू कालांतराने निर्बल होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते. त्यामुळे हा मार्ग अनुसरु नये, असाच सल्ला दिला जातो. यातून नवा प्रयोग म्हणून असे काहीतरी अचाट करायचे असल्यास ते योग्य आणि अधिकृत तज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावे, असेही निक्षून सांगण्यात येत आहे.









