वृत्तसंस्था/ पॅरीस
येथे 28 मे ते 11 जून दरम्यान होणाऱ्या रेड क्ले कोर्टवरील फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून ब्रिटनचा माजी टॉप सिडेड टेनिसपटू अँडी मरे तसेच इटलीचा मॅटो बेरेटेनी यांनी तंदुरुस्तीच्या समस्यामुळे माघार घेतल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली आहे.
36 वर्षीय अँडी मरेने 2017 साली फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. तसेच त्यांनी आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत तीन ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवली आहेत. अलीकडच्या कालावधीत मरेला वारंवार दुखापतीने हैराण केले होते. त्यामुळे तो 2023 च्या टेनिस हंगामात माँटेकार्लो, माद्रिद, रोम, बोर्डेक्स स्पर्धांमध्ये खेळू शकला नाही.
इटलीचा 20 वा मानांकित टेनिसपटू मॅटो बेरेटेनी दुखापतीच्या समस्येमुळे फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत खेळणार नाही. गेल्या एप्रिल महिन्यात झालेल्या माँटेकार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेत खेळताना 27 वर्षीय बेरेटेनीला ही दुखापत झाली होती. सदर दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झाली नसल्याने आपण प्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही असे त्याने स्पर्धा आयोजकांना कळवले आहे.









