प्रतिनिधी /वास्को
मुरगावचे नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पालिका प्रशासकीय संचालकांना सादर केला. दामोदर कासकर हे विद्यमान पालिका मंडळाचे पहिले नगराध्यक्ष होते. जवळपास चौदा महिने कासकर यांनी नगराध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला.
मुरगावच्या नगराध्यक्षपदी दामोदर कासकर यांची मागच्या वर्षी बिनविरोध निवड करण्यात आली होती. पालिका निवडणुक झाल्यानंतर भाजपाच्या समर्थनात 25 पैकी 23 नगरसेवक उभे राहिले होते. त्यापैकी तिघे नगरसेवक भाजपाच्या अधिकृत उमेदवारांविरूध्द विजयी झालेले होते. भाजपाला भक्कम पाठबळ लाभल्याने मागच्या वर्षभरात या पालिका मंडळाने कोणत्याही अडचणीवीना सत्ता चालवली. मात्र, अलिखित करारानुसार दुसऱया नगरसेवकाला संधी देण्यासाठी दामोदर कासकर यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. मुरगावचे नवीन नगराध्यक्ष म्हणून नगरसेवक लियो रॉड्रिक्स यांचे नाव चर्चेत आहे.









