जत तालुक्यातील घटना, एक आरोपी अटकेत, तिघेजण बेपत्ता
जत : घराकडे जाण्याच्या रस्त्यावर पत्राशेड मारू नको, म्हणून सांगण्यास गेलेल्या तरुणाचा लाकडी दांडक्याने मारहाण करुन निर्घृणपणे खून करण्यात आला. बाबू उर्फ हिरोल रामचंद्र मलाळकर (वय 27, रा. अचकनहळळी, ता. जत) असे मृताचे नाव आहे. सोमवार, 2 जून रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत जत पोलिसांत मयताची आई सावित्री मलाळकर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांंनी मंजुनाथ नारायण काळे, कऱ्याप्पा रामाण्णा कग्ग़ोड, सावित्री नारायण काळे व चंदाबाई कऱ्याप्पा कग्गोड (सर्व रा. अचकनहळळी, ता. जत) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यातील मंजुनाथला पोलिसांनी तत्काळ अटक केली असून जत न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. उर्वरित तीन आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध जत पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित मंजुनाथ काळे हा मृत हिरोल मलाळकर यांच्या घराकडे जाण्याचे रस्त्यावर पत्रा शेड मारत होता. यावेळी फिर्यादी सावित्री यांचा मुलगा हिरोल हा रस्त्यावर पत्रा शेड मारू नको, असे सांगण्यासाठी गेला होता. यावेळी दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. दरम्यान, संशयिताने धक्काबुक्की केली.
लगेचच मंजुनाथने लाकडी दांडक्याने हिरोलच्या डोक्यात, पाठीवर मारहाण केली. यामध्ये हिरोल खाली पडला. यानंतरही संशयिताने मारहाण केली. या गंभीर मारहाणीत हिरोलचा जागीच मृत्यू झाला. यापूर्वीही संशयित मंजुनाथ काळेने हिरोलला मी रस्त्यावर पत्रा शेड मारणार आहे, कोणी आडवे आले तर त्याला संपवणार, अशी धमकीही दिली होती.
ही घटना समजताच उपअधीक्षक सुनील साळुंखे, सपोनि संदीप कोळेकर यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. रात्री उशिरा जत ग्रामीण रुग्णालय येथे हिरोल मलाळकरच्या मृतदेहावर शवविच्छेदन केले. तपास निरीक्षक संदीप कोळेकर करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला होता. शिवाय आरोपीच्या घरावर दगडफेक झाल्याची चर्चा होती.








