हुंचेनहट्टी येथील घटनेने खळबळ : दोघा संशयितांना पोलिसांनी केली अटक
बेळगाव : गुटखा खाऊन घरावर का थुंकलास? असे म्हणत चार वर्षांपूर्वी किरकोळ भांडण झाले होते. तेव्हापासून असलेल्या पूर्ववैमनस्यातून पिरनवाडी येथील एका तरुणाचा खून झाल्याची घटना गुऊवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी तातडीने दोघांना अटक केली आहे. अरबाज रफीक मुल्ला (वय 22, रा. हैदरअली चौक, पिरनवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अरबाज हा आपल्या आजीजवळ राहत होता. त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला असून आई कुवेतमध्ये तर वडील हे पिरनवाडीमध्ये राहतात. मयत अरबाज आणि खून केलेला संशयित आरोपी प्रसाद नागेश व•र (रा. जन्नतनगर, पिरनवाडी) यांच्यामध्ये भांडण झाले होते. प्रसाद याला गुटखा खाऊन आमच्या घराजवळ का थुंकलास, असे अरबाज याने चार वर्षांपूर्वी विचारले होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये वादावादी झाली होती. 15 दिवसांपूर्वी प्रसाद आणि अरबाज हे दोघे एकत्र आले होते. त्यांनी एकत्र मद्यप्राशनही केले. त्यावेळी अरबाज याने तुला संपवितो, अशी धमकी दिली होती. त्या रागातून प्रसाद आणि त्याचा साथीदार प्रशांत रमेश कर्लेकर (रा. सिद्धेश्वर गल्ली, पिरनवाडी) या दोघांनी त्याला पार्टी कऊया म्हणून गुऊवारी सायंकाळी घरातून हुंचेनहट्टी येथील जैन कॉलेजच्या बाजुला असलेल्या खुल्या जागेमध्ये नेले.
त्या ठिकाणी हातातील कड्याने अरबाजच्या डोक्यामध्ये प्रशांतने जोरदार वार केला. त्यानंतर तो खाली कोसळला. पुन्हा त्याच्यावर दोन-चार वार करून या दोघांनी तेथून पलायन केले. डोक्यावर झालेल्या जबर प्रहाराने गुरुवारी रात्रीच अरबाजचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी जैन कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कोणी तरी पडल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी बेळगाव ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर, पोलीस उपनिरीक्षक एल. एस. जोडट्टी, पोलीस उपनिरीक्षक आदित्य राजन, हवालदार एस. एस. निडवाणी, शिवराज पाचन्नावर, श्रीकांत उप्पार, महेश नाईक, सन्नाप्पा हंचिनमनी, मारुती कोटबागी हे घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर त्यांनी तातडीने फॉरेन्सिक अधिकारी व श्वान पथकाला पाचारण केले. यावेळी अरबाजची आजी त्या ठिकाणी आक्रोश करत होती. याबाबत तिला विचारले असता तिने दोन तरुणांनी त्याला बोलावून नेल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने वरील दोघा संशयितांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली दिली. पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवारागात पाठविण्यात आला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.









