होनिहाळ येथील खुनाचे गूढ उलगडले, मारिहाळच्या दोघांना अटक
प्रतिनिधी/ बेळगाव
होनिहाळ, ता. बेळगावजवळ पंधरा दिवसांपूर्वी एका तरुणाचा खून झाला होता. या खून प्रकरणाचा उलगडा झाला असून मारिहाळ पोलिसांनी मारिहाळ येथील दोघा जणांना अटक केली आहे. खून झालेल्या तरुणाने लिफ्ट मागितली होती. त्याच्या बदल्यात पैसे दिले नाहीत म्हणून त्याचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
शिवानंद निंगाप्पा करवीनकोप्प (वय 28), आकाश गंगाप्पा मॅगोटी (वय 21) दोघेही राहणार मारिहाळ अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी शनिवारी सायंकाळी एका पत्रकाद्वारे यासंबंधीची माहिती दिली आहे.
निंगनगौडा शिवनगौडा सनगौडर (वय 27) मूळचा रा. आलदकट्टी, ता. सौंदत्ती सध्या रा. श्रीनगर याचा सोमवार दि. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी होनिहाळ येथील शेतजमिनीत खून झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटली नव्हती. त्याचदिवशी रात्री मृतदेहाची ओळख पटवून तपासाला सुरुवात करण्यात आली होती.
बेळगाव ग्रामीणचे एसीपी गंगाधर बी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली मारिहाळचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी, उपनिरीक्षक मंजुनाथ, चंद्रशेखर, हवालदार बी. एन. बळगन्नवर, बी. बी. क•ाr, एम. बी. बडीगेर, हणमंत यरगुद्री, रामकृष्ण तळवार, चन्नाप्पा हुनचाळ, रेवणसिद्ध बळवुंडगी आदींनी मारिहाळ येथील दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तांत्रिक विभागातील कर्मचारी रमेश अक्की व महादेव यांचीही मदत मिळाली आहे.
रविवार दि. 17 नोव्हेंबर रोजी खून झालेला तरुण मारिहाळजवळ वाहनाच्या प्रतीक्षेत उभा होता. त्यावेळी शिवानंद व आकाश हे याच मार्गावरून जात होते. निंगनगौडाला पाहून या दोघा जणांनी आपली मोटारसायकल थांबवली. ‘येथे का उभा आहेस?’ अशी विचारणा केली. ‘मला श्रीनगरपर्यंत लिफ्ट द्या, तुम्हाला हजार रुपये देतो’ असे निंगनगौडाने सांगितले. हे तिघे दारू पिण्यासाठी एका बारमध्ये घुसले. त्यानंतर निंगनगौडाने आपल्याजवळ पैसे नाहीत, असे सांगितले. या तिघा जणांमध्ये भांडण झाले. त्याला मोटारसायकलवरून होनिहाळ येथील आण्णाप्पा होरकेरी यांच्या शेतजमिनीत नेऊन सिमेंटच्या विटांनी हल्ला करून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी मोटारसायकलही जप्त केली आहे.









