कारमध्ये मिळालेला सडलेला मृतदेह
वृत्तसंस्था/भटिंडा
पंजाबच्या भटिंडा येथील एका रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये बुधवारी रात्री एका कारमध्ये महिलेचा सडलेला मृतदेह मिळाल्याने खळबळ उडाली. पोलिसांच्या चौकशीत हा मृतदेह सोशल मीडिया एन्फ्लुंएसर कंचन कुमारीचा असल्याचे उघड झाले. कंचन कुमारी ‘कमल कौर भाभी’ नावाने इन्स्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रीय होती. कंचन कुमारी ही लुधियानाच्या लछमन कॉलनीत राहत होती. तिच्या इन्स्टाग्राम अकौंटवर 3.83 लाख फॉलोअर्स आहेत. कंचन ही 9 जून रोजी भटिंडा येथे एका प्रमोशनल कार्यक्रमात सामील होण्यासाठी घरातून बाहेर पडली होती, त्यानंतर तिचा कुटुंबीयांशी संपर्क झाला नव्हता. बुधवारी रात्री रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारमधून दुर्गंधी येऊ लागल्यावर लोकांनी पोलिसांना कळविले होते.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कारची झडती घेतली असता मागील सीटवर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेह कंचन कुमारीचा असल्याचे स्पष्ट झाल्यावर तिच्या कुटुंबीयांना कळविण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक नरिंदर सिंह यांनी सांगितले. काही महिन्यांपूर्वी एका विदेशी गँगस्टरने सोशल मीडियावरील कंचन कुमारीच्या कंटेंटवरून टीका केली होती. पोलीस आता याप्रकरणी हा पैलू विचारात घेत तपास करत आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात कॅनडातील दहशतवादी अर्श दल्लाने कंचन कुमारीला कथित स्वरुपात अश्लील व्हिडिओ पोस्ट करणे बंद करण्याची धमकी दिली होती. तर मृतदेह हस्तगत झालेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. संबंधित भागातील सीसीटीव्ही फुटेज पडताळून पाहिले जात आहे.









