पोलीस उपाधिक्षक मंगेश चव्हाण यांची माहिती : पोलीसांकडून 24 तासात छडा : सुपारी देवून काढला काटा : मुख्य आरोपीसह तिघांना अटक : पाच दिवसांची पोलीस कोठडी
इस्लामपूर प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील पांडुरंग भगवान शिद (40) याचा खून प्रेमसंबधांच्या संशयावरुन गोळया घालून करण्यात आल्याचा 24 तासात छडा पोलीसांनी लावला. या प्रकरणी मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. शिद याचा सुरेश नारायण ताटे (45 रा.लोणारगल्ली उरूण-इस्लामपूर) याने आपल्या असणाऱ्या दोघा कामगारांना सुपारी देवून काटा काढला.संशयीतांनी बंदुकीतून गोळया झाडून खून केल्याची कबुली दिली असून आरोपींना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलीस उपाधिक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रकार बैठकीत दिली.
विशाल जयवंत भोसले(25 रा.कामेरी ता.वाळवा), शिवाजी भिमराव भुसाळे(37, महादेवनगर इस्लामपूर मुळ रा.उजळम ता.बसवकल्याण जि. बिदर राज्य कर्नाटक) अशी मृतावर गोळया झाडणाऱ्या आरोपींची नावे आहेत. पांडुरंग शिद यांची शेत जमीन व शेतवस्ती वाटेगाव शिवेलगत आहे. शुक्रवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिंदे हा आपल्या हिरो होंडा मोटर सायकल क्रमांक एम एच 10 सीजी 6070 वरुन घरी येत होता. त्यावेळी विशाल भोसले, शिवाजी भुसाळे यांनी त्याच्यावर बंदुकीतून दोन गोळया झाडल्या. यामध्ये एक गोळी शिंदे याच्या डोक्यात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
पांडूरंग याच्यावर कासेगाव पोलीस ठाण्यात सावकारकीचा गुन्हा नोंद असल्याने हा खून देवाण- घेवाणीच्या कारणातून झाला असल्याची शक्यता पोलीसांना होती. परंतू हे प्रकरण फारच गुंतागुंतीचे होत गेल्याने पोलीसांनी विशेष पथके तयार केली. दरम्यान पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलीस अध्यक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधिक्षक रितू खोकर यांनी ही घटनास्थळास भेट देवून मार्गदर्शन केले. हा गुन्हा उघडकीस आण्यासाठी पोलीस उपाधिक्षक मंगेश चव्हाण व पोलीस निरीक्षक सतिश शिंदे व कासेगाव पोलीस ठाण्याचे हरीशचंद्र गावडे यांना वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार जमिनीचा आर्थिक व्यवहार, सावकारीकी, अनैतिक संबंधांच्या अनुषंगाने तपासास सुरवात केली. सी.सी.टी फुटेज, डंप डाटा काढण्यात आला. या तपासा दरम्यान 37 अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हा उघडकीस आणला.
दरम्यान गोपनिय माहितीच्या आधारे संशयीतांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता, सुरेश नारायण ताटे याने पत्नीचे मृत पाडूरंग सोबत असणाऱ्या प्रेमसंबंधाच्या संशयाचा राग मनात धरुन आपल्या कामगारांना पैशाचे अमिष व दमदाटी करुन, धमकावून कृत्य करण्यास भाग पाडले असल्याचे समोर आले. त्याने दोघांना 6 लाख रुपयांची सुपारी देण्याचे अश्वासन देवून 50 हजार रुपये किंमतीची बंदूक खरेदी करुन दिली होती. तसेच मृत पांडूरंग व ताटे कुटुंबाचे पै-पाहुण्याचे संबंध आहेत. ताटे याचे हे दुसरे लग्न असून त्याचे ही पहिल्या पत्नीशी पटत नसल्याचे तपासात पुढे आले आहे.
रेकी करुन दिले बंदुक चालवण्याचे प्रात्यक्षिक
या प्रकरणी अधिक माहिती देताना पोलीस उपाक्षिक चव्हाण म्हणाले, या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश ताटे याने बंदुक खरेदी करण्यासाठी अनेक ठिकाणी चाचपणी केली असल्याने पोलीसांचा संशय बळावला. ताटे याने एका कडून 50 हजार रुपये देवून ही बंदुक खरेदी केली. त्यानंतर शिवाजी व विशाल यांना अज्ञातस्थळी नेवून युटुबव्दारे बंदूक चालवण्याचे प्रात्यक्षिक करुन घेतले. त्यानंतर पांडूरंग याच्यावर नजर ठेवून घटनास्थळाची पहाणी करुन पांडूरंग याचा काटा काढला.
बंदूक विक्री करणाऱ्याचा शोध सुरू
या प्रकरणात बंदूक विक्री करणाऱ्या अनोळखीचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्याकडून शस्त्र विक्री करणाऱ्या व पुरवणाऱ्या टोळीचा शोध घेणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.