मुलाकडून लाकडी ओंडक्याने डोक्यात वार : उडकेरीतील घटना, दोडवाड पोलिसात नोंद
बेळगाव : एक एकर जमिनीसाठी मुलाने आईचा खून केल्याची घटना उडकेरी, ता. बैलहोंगल येथे घडली आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून दोडवाड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. महादेवी गुराप्पा तोटगी (वय 70) रा. उडकेरी असे खून झालेल्या दुर्दैवी वृद्धेचे नाव आहे. तिचा मुलगा इराप्पा गुराप्पा तोटगी (वय 34) याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. बैलहोंगल पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी इराप्पाला ताब्यात घेतले आहे. महादेवीच्या नावे उडकेरी येथे एक एकर शेतजमीन आहे. ही जमीन विकून बेंगळूरला स्थलांतरित होण्याचा विचार मुलाने केला होता. मात्र, महादेवीने आपल्या नावावरील जमीन विकण्यासाठी होकार दिला नाही. शनिवारी रात्री इराप्पाने आपल्या आईकडे 300 रुपये मागितले. तिने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे लाकडी ओंडक्याने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात महादेवीचा मृत्यू झाला. केवळ लाकडाने हल्ला करून इराप्पा थांबला नाही. तर भिंतीला तिचे डोके आदळले. या हल्ल्यात महादेवीचा जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, दोडवाडचे पोलीस उपनिरीक्षक नंदीश व प्रवीण कोटी आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.









