राहुल गांधी यांचा आरोप : स्मृती इराणींनी आरोप फेटाळले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संसदेच्या अधिवेशनाचा बुधवारचा दिवस वादळी ठरला. मणिपूर मुद्यावर सुरू असलेल्या विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत सहभागी झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि अमित शहा यांनी चोख प्रत्युत्तर दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जवळपास दोन तास केलेल्या भाषणातून ‘युपीए’चे कारनामे उलगडतानाच पंतप्रधान मोदी यांच्यावरच देशाचा विश्वास असल्याचा दावा केला. तर, दुसरीकडे अविश्वास प्रस्तावावरच्या चर्चेनंतर असभ्य वर्तन केल्याने राहुल गांधी आरोपांच्या भोवऱ्यात अडकले. सभागृहातून जात असताना राहुल यांनी फ्लाईंग किसचा इशारा केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणी दृष्टिपथात आहे. दरम्यान, गुरुवारी सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वासदर्शक ठरावावर बोलणार असून त्यानंतर मतदान होणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष संसदेकडे लागलेले आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील अविश्वास प्रस्तावावरील दुसऱ्या दिवसाच्या चर्चेला राहुल गांधी यांच्या भाषणाने सुऊवात झाली. 35 मिनिटांच्या भाषणात राहुल यांनी भारत जोडो यात्रा आणि मणिपूरबद्दल भाष्य केले. आमचे पंतप्रधान आजपर्यंत मणिपूरला गेलेले नाहीत. मणिपूर त्यांच्यासाठी भारत नाही. ‘इंडिया’च्या शिष्टमंडळाने मात्र मदत छावणीपर्यंत जात महिला आणि मुलांशी चर्चा केली. पंतप्रधानांनी आजपर्यंत तसे केलेले नाही, असे राहुल गांधी म्हणाले. लष्कर मणिपूरमध्ये एका दिवसात शांतता प्रस्थापित करू शकते. हे सरकार भारतमातेचे रक्षक नाही, भारतमातेचे मारेकरी आहे, असे आरोपही राहुल गांधी यांनी केले.
लोकसभेचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत पहिले भाषण केले. विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेच्या दुसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी अनेक मुद्यांवर मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी राहुल म्हणाले की, मणिपूरमधील या लोकांनी संपूर्ण भारताची हत्या केली आहे. याशिवाय काँग्रेस नेते राहुल यांनी आपल्या भाषणादरम्यान मणिपूर दौऱ्यात भेटलेल्या महिलांची कहाणीही सांगितली. राहुल यांनी हरियाणातील नूह येथील हिंसाचाराचाही उल्लेख केला.
स्मृती इराणी राहुल गांधींवर बरसल्या
राहुल यांच्या भाषणाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्राच्या इतिहासात प्रथमच भारतमातेच्या हत्येची चर्चा झाली. मात्र काँग्रेस पक्ष इथे टाळ्या वाजवत राहिला. भारतमातेची हत्या केल्याचा मुद्यावर टाळ्या वाजवणाऱ्यांनी कोणाच्या मनात विश्वासघात आहे, हे साऱ्या देशाला दाखवून दिल्याचा हल्लाबोल इराणींनी केला. तसेच मणिपूरचे तुकडे झालेले नसून तो माझ्या देशाचा एक भाग असल्याचा दावाही त्यांनी केला. मणिपूरचे तुकडे झालेले नाहीत आणि होणारही नाहीत’ असे त्यांनी ठासून सांगितले.
मोदींशिवाय इतर कोणत्याही मंत्र्याशी मणिपूरवर चर्चा न करण्याच्या विरोधकांच्या भूमिकेवरही स्मृती इराणींनी टीका केली. देशाचे गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंग यांनी चर्चा करण्याची तयारी दर्शवली होती. पण विरोधकच सभागृहातून पळून गेले. कारण काय? तर गृहमंत्री जेव्हा बोलायला लागतील, तेव्हा यांना गप्प बसावे लागेल, असेही त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी मणिपूरवर बोलत असताना काँग्रेसवर कडाडून टीका केली. काश्मिरी पंडितांची हत्या झाली तेव्हा काँग्रेस काय करत होते? असा प्रश्न स्मृती इराणींनी उपस्थित केला. तसेच गिरीजा टिक्कू या काश्मिरी महिलेचा उल्लेख केला. गिरीजा टिक्कू यांचे कुटुंब तीन दशक शांत होते. मात्र काश्मीर फाईल्स हा सिनेमा आल्यानंतर त्यांच्यावरचे अत्याचार समोर आले. त्यांची भाची सिद्धी रैना यांनी इन्स्टाग्राम पोस्ट लिहून यावर भाष्य केले होते. ही पोस्ट चांगलीच व्हायरलही झाली होती. आज लोकसभेत स्मृती इराणी यांनी याच गिरीजा टिक्कूचा उल्लेख करत काँग्रेसला जाब विचारला. गिरिजा टिक्कू यांना काश्मीरमध्ये एका बसमधून खेचून बाहेर काढत त्यांच्यावर वारंवार सामूहिक बलात्कार करण्यात आले होते. तसेच त्यांच्या शरीराचे अनेक तुकडे करण्यात आले होते. या घटनेतील आरोपींना काँग्रेसच्या शासनकाळात कुठलीच कारवाई झाली नसल्याची टीका इराणी यांनी केली आहे.









