टोळीयुद्धात गँगस्टर तुफान अन् मनमोहनने गमावला जीव
@ वृत्तसंस्था / तरनतारन
पंजाबच्या तरनतारन येथील गोइंदवाल साहिब तुरुंगात रविवारी टोळीयुद्ध भडकले असून यात गँगस्टर मनदीप तुफान आणि गँगस्टर मनमोहन सिंह मोइनाची हत्या करण्यात आली आहे. तर तिसरा गँगस्टर केशव गंभीर जखमी झाला असून त्याला अमृतसरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुफान आणि मनमोहन हे पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येप्रकरणी आरोपी होते. मनदीप तुफानला पोलिसांनी गँगस्टर मणि रइयासोबत अटक केली होती.
गोइंदवाल साहिब तुरुंगात आरोपींदरम्यान मारहाण झाली, ज्यात मनदीप मारला गेला. तर केशव आणि मनमोहन सिंह मोहनला तरनतारन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असताना मनमोहनचा मृत्यू झाला. मारले गेलेल्या गँगस्टर्स विरोधात अनेक गुन्हे देखील नोंद होते, तिघेही एकाच टोळीत सक्रीय होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक गुरमीत सिंह चौहान यांनी दिली आहे.
मूसेवालाच्या हत्येप्रकरणी 2 मुख्य शूटर्सना मागील वर्षी सप्टेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. मनदीप सिंह उर्फ तूफान तसेच मनप्रीत सिंह उर्फ मणि रइया यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. तर सिद्धू मूसेवाला या नावाने प्रसिद्ध शुभदीप सिंह सिद्धूची 29 मे रोजी मनसा जिल्हय़ात गोळय़ा घालून हत्या करण्यात आली होती. गँगस्टर गोल्डी बरार हा या हत्येचा सूत्रधार असल्याचे मनसा येथील न्यायालयात मागील महिन्यात दाखल 1850 पानी आरोपपत्रात म्हटले गेले हेते. बरारने मूसेवालाची हत्या घडवून आणण्यासाठी जग्गू भगवानपुरिया, लॉरेन्स बिश्नोई आणि अन्य गुंडांची मदत घेतली होती.









