चाकूने स्वत:वरही केले वार : बिडी येथील घटनेने खळबळ
वार्ताहर / नंदगड
बिडी (ता. खानापूर) येथे प्रियकरानेच प्रेयसीचा खून कऊन स्वत:ही चाकूने भोसकून घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दि. 14 रोजी रात्री 9 वा. घडली. या घटनेमुळे बिडी परिसरात एकच खळबळ माजली. या घटनेत मृत पावलेले आनंद राजू सुतार (35) व रेश्मा शिवानंद तिरवीर (28) हे दोघेही विवाहित आहेत. अनैतिक संबंधातून दोघांचे जीव गेले असून दोघांचेही संसार आता उघड्यावर पडले आहेत. या घटनेची नोंद नंदगड पोलिसात झाली आहे.
बिडी गावच्या पश्चिमेला मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या नयानगर वसाहतीमध्ये आनंद राजू सुतार व रेश्मा शिवानंद तिरवीर हे एकमेकाला लागून असलेल्या गल्लीत राहत होते. आनंद सुतार हा फर्निचरचे काम करत होता. त्याला पत्नी, नऊ वर्षाचा व सात वर्षाचा असे दोन मुलगे तर पाच वर्षाची एक मुलगी आहे. रेश्मा तिरवीर ही आपला पती शिवानंद, अकरा वर्षाची मुलगी, नऊ वर्षाचा मुलगा यांच्या समवेत राहत होती. रेश्मा हिचा पती शिवानंद शेती व्यवसाय करत होता. गुरे पाळून दुग्ध व्यवसाय तो सांभाळत होता. गेल्या काही महिन्यांपासून शिवानंद यांची पत्नी रेश्मा व आनंद सुतार यांच्यात प्रेमाचे संबंध जुळले होते. रेश्मा हिच्या पतीला याची माहिती समजतात त्याने आपल्या पत्नीला ताकीद दिली होती. तरीही आनंदशी ती बोलतच होती. रेश्मा ही आनंद बरोबर मोबाईलवर बोलताना शिवानंदने पाहिले. त्यानंतर महिन्यापूर्वीच आनंदच्या विरोधात शिवानंदने नंदगड पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनीही त्यांच्या मुलांबाळाचा विचार करून दोघांनाही समजुतीने सांगून सोडून दिले होते.
रेश्मावर चाकूने केले सपासप वार
गुरुवार दि. 14 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास रेश्मा हिचा पती शिवानंद नेहमीप्रमाणे दूध घालण्यासाठी डेअरीला गेला होता. यावेळी रेश्मा व तिची मुलगी, मुलगा घरी होते. पाठीमागच्या दरवाजातून आनंद हा हातात चाकू घेऊन रागाने रेश्माच्या घरी घुसला. त्याने काही क्षणातच रेश्माच्या पाठीवर, पोटावर चाकूने सपासप वार केले. अधिक रक्तस्त्राव झाल्याने रेश्मा रक्ताच्या थारोळ्यात कोसळली अन् गतप्राण झाली. रेश्मा हिचा मृतदेह पाहताच आनंदने त्याच चाकूने स्वत:वर ही वार करून घेतले. घाव वर्मी लागल्याने आनंद त्याच ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. या अचानक घडलेल्या घटनेमुळे रेश्मा याची दोन्ही मुले घाबरून घराबाहेर पळून गेली. त्यांनी आरडाओरडा करताच गल्लीतील लोक जमा झाले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळाची पाहणी करताच आनंद याचे पाय हालत असल्याचे दृष्टीस पडले. त्याचा जीव वाचवण्यासाठी अॅम्बुलन्स बोलून बेळगाव येथील इस्पितळात दाखल केले. परंतु अधिक रक्तस्त्राव झाल्याने उपचाराचा उपयोग झाला नाही. काही वेळातच आनंद यांचाही मृत्यू झाला. एका अनैतिक प्रेमसंबंधातून दोन जीव गेल अन् दोघांचे संसार उघड्यावर पडले. त्यांची मुले पोरकी झाल्याने ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत हेती.









