पिंपरी / प्रतिनिधी :
राज्यात सत्तेवर असलेले घटनाबाह्य सरकार देशासाठी घातक आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अवमान करणाऱ्या या सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे. महिला आमदाराला शिवीगाळ केली जाते, गद्दार आमदार पोलिसांवर गोळीबार करतो, तर सत्याची बाजू मांडणाऱ्या पत्रकाराचाही गळा दाबला जातो. तरीही या सरकारकडून काहीही कारवाई होत नाही. भाजपच्या महाशक्तीविरोधात लढा देण्यासाठी जनशक्तीची वज्रमूठ आपल्याबरोबर आहे. या ताकदीच्या जोरावर महाविकास आघाडी विजयी होईल, असा विश्वास युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात मार्गदर्शन करताना ठाकरे बोलत होते. सभेतील गर्दीकडे बोट करत आमच्या सभेला जनतेची गर्दी असते. तर घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्र्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते, टोला लगावत ते म्हणाले, ’50 खोके एकदम ओके’ हे वाक्य महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर कोणालाच झोंबणार नाही. कारण आम्ही शपथ घेऊन सांगू शकतो, की आम्ही खोक्याला हात लावला नाही. मात्र ‘आम्ही खोक्याला हात लावला नाही’ असे 40 गद्दार आमदार आणि 13 खासदारांपैकी एकही जण बोलला नाही. गद्दारांना याचा जाब विचारल्यावर मागे पोलीस लावले जातात. लाठीचार्ज केला जातो. त्याच्या घरी धाड पडते आणि तपास यंत्रणा मागे लावल्या जातात.
अधिक वाचा : प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीवर GPS ची नजर
विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर व अन्य नेते उपस्थित होते.